हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोव्यातील भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत पण म्हणून काँग्रेस ने फेस्ट साजरा करण्याची गरज नाही असे म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे.
गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. तो गोयंकर जनतेलाच रोखावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे सरकार गोव्यात बदनाम झाले आहे. भाजप हा इतर पक्षांतून घुसलेल्या दलाल, जमीन माफियांची ‘मोट’ बनला आहे. अर्थात, गोव्यातील भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत म्हणून काँग्रेसने ‘फेस्ट’ साजरा करण्याची गरज नाही असे शिवसेनेनं म्हंटल.
उत्तर प्रदेशच्या तुलनेत गोवा हे लहान राज्य असले तरी दोन्ही राज्यांचे राजकीय चरित्र सारखेच आहे. राजकीय निष्ठा, विचार, भूमिका याचा ताळतंत्र सोडून लोक सर्रास इकडून तिकडे उडय़ा मारीत आहेत. गोव्यासारख्या एकेकाळच्या सत्त्वशील राजकारणाची सूत्रे आता मूठभर प्रस्थापित जमीन माफिया, ड्रग्जचे व्यापारी, दलाल मंडळींच्या हाती गेल्याने तेथील सामान्य माणसाची अवस्था चिंताजनक झाली आहे.
आज तरी गोव्याच्या राजकारणात कोणीच कोणाचा राहिलेला नाही. फक्त उत्पल पर्रीकर काय करतात तेवढेच आता पाहायचे? उत्पल जिद्दीने मैदानात उतरले व लढले तर भविष्यात ते गोव्याचे नेते होतील. पण त्यांची लढाई भाजपच्या बेइमानीविरुद्ध आहे हे त्यांनी विसरू नये असा सल्ला शिवसेनेनं उत्पल पर्रीकर यांना दिला.