हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 96 वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल भरभरून बोलले. बाळासाहेबांनी मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले अस संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते अस राऊत यांनी म्हंटल.
बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक गोष्टी दिल्या, त्यांनी दिलेल्या शिदोरीवर राज्य आणि देश पुढे चालला आहे. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी होती. त्यांनी कधी कोणावर अन्याय होऊ दिला नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांचे जीवन म्हणजे धगधगत अग्निकुंड होत असे संजय राऊत यांनी म्हंटल.
यावेळी त्यांनी भाजपला टोला लगावला. बाळासाहेब असताना कोणाची पोपटपंची चालली नाही. विरोधी पक्षात आज जी कावकाव सुरू आहे, फडफड सुरू आहे,जर बाळासाहेब असते तर ती थंड पडली असती असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
माझ्या संपूर्ण जीवनावर बाळासाहेबांचा विशेष प्रभाव होता. बाळासाहेब नसते तर मी सुद्धा आज तुम्हाला दिसलो नसतो. आज मी जो कोणी आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहे असं म्हणत दुसरे बाळासाहेब होणे नाही अस संजय राऊत यांनी म्हंटल.