मुंबई । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. केंद्रात मंत्री असणारे दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर न्यायाची मागणी करत रस्त्यावर उतरले होते. मात्र हेच सगळे लोक आता उत्तर प्रदेश येथे जेव्हा अशा प्रकारच्या बलात्कार आणि हत्येच्या घटना होतात तेव्हा शांत बसतात अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी यावेळी केली. निर्भयावेळी जी भूमिका घेतली तीच भूमिका केंद्रातील महिला नेत्यांनी आता घेणं गरजेचं असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. देशात कायद्याची भीती संपत आहे असं वाटू लागलं असल्याचं टीका त्यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
“निर्भया प्रकरणानंतर नवीन कायदा करावा लागला होता. आज जे केंद्रात मंत्री आहेत ते आमचे साथीदार होते. आजही आहेत. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरले होते. पण आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे जेव्हा अशा प्रकारच्या बलात्कार आणि हत्येच्या घटना होतात तेव्हा सगळे शांत बसतात असं म्हणत राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकाराच्या मंत्र्यांवर निशाणा साधला.
महिला अत्याचाराच्या घटनांशी सरकारचा कोणताही संबंध नसतो. पण जी पोलीस यंत्रणा, राजकीय व्यवस्था असते त्यांनी तपास करुन गुन्हेगांना फासावर पोहोचवण्याचं काम करायचं असतं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “अशा घटना का घडतात यासंबधी वारंवार चर्चा झाली आहे. सध्या देशात अशा घटना वाढत आहेत. कायद्याची भीती संपत आहे असं वाटू लागलं आहे. निर्भयावेळी जी भूमिका घेतली आज तीच भूमिका केंद्रातील महिला नेत्यांनी घेणं गरजेचं आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
युपी पोलिसांनी बळजबरीने केले पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेच्या शवावर अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता युपी पोलिसांनीच बळजबरी मध्यरात्री केले. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.
रात्री १० वाजता पीडित तरुणीचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान याआधी पीडित तरुणीच्या वडील आणि भावाकडून रुग्णालयाबाहेर निदर्शन करण्यात आलं. परवानगी न घेताच पार्थिव नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यासोबत काँग्रेस तसंच भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी यानंतर कुटुंब धरणे आंदोलन करत असून इतर काही संघटनांनी या मुद्द्यावर राजकारण सुरु केलं असल्याचा आरोप केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.