मुंबई । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भाजप सरकार आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटले जाते. तिथं एक मुलीवर बलात्कार, खून होतो आणि आरोपींना वाचवलं जातं. इतरत्र मात्र कुणा एका अभिनेत्रीच्या घरावरील कौले जरी उडवली तरी त्याला अन्याय म्हटले जाते. आता रामदास आठवले कुठं आहेत ? असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावलाय.
कंगना राणावतचे कार्यालय पालिकेने तोडल्यानंतर कंगनावर अन्याय झालाय अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली होती आणि पालिकेवर निशाणा साधला होता. त्यांनी कंगनाची भेट घेत तिला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देखील दिले होते. त्यानंतर कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या पार्श्वभुमीवर राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांची युपीबाबत भूमिका काय ? त्यांनी तिथे राष्ट्रपती राजवटीची मागणी करवी असे राऊत म्हणाले. वेगळ्या राज्यात अशा घटना घडतात, तेव्हा आवाज उठतो मग आता का नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आम्ही शांतपणे याकडं पाहतोय. संधी मिळेल तेव्हा आवाज उठवेन असे राऊत म्हणाले.
‘मुख्यमंत्र्यांची भेट घेणार’
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी युपीच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. तर बलात्काऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली. पिडितेच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्यता द्यावी तसंच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.