मुंबई । अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाचं नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. मुंबईबाबत काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात. मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावलं उचलावीत. हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान असून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.
“पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुंबईत १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचं रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. १९९२ च्या दंगलीत मुंबईचे पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनीच लोकांना वाचवलं. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही अशी वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. हे मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याच मोठं कारस्थान दिसत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईबाबत काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात. मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावलं उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत. त्या पक्षांना पाकव्याप्त काश्मीरने मदतान केलं आहे का? तुम्हाला पाकिस्तानी लोकांनी मतदान केलं आहे का? मुंबई पोलीस हे पाकिस्तानचे पोलीस आहेत का? ज्या मुंबई पोलिसांनी अतिरेकी हल्ले परतवून लावून मुंबईचं संरक्षण केलं ते लोक काहीही बरळणार आहेत का? असा सवाल करतानाच झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे. ड्रग्सच्या गुळण्या करून आणि नशेच्या अंमलात कुणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल आणि अशा व्यक्तिला कोणी पाठिंबा देत असेल तर देशाचं राष्ट्रीयत्व किती खालच्या पातळीवर गेलं हे दिसून येतं, असंही ते म्हणाले. संजय राऊत यांनी यावेळी भाजपाचं नाव घेणं टाळलं. “कोणत्याही राजकीय पक्षाने पाठबळ निर्माण करण्याच्या हेतूने अशा व्यक्तींच्या पाठीशी उभं राहू नये, ते बुमरँग होईल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
“माझं नाव घेऊन कुणाला पब्लिसिटी स्टंट करायचा असेल तर खुशाल करा. मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर मी पोकळ धमकी देत नाही, ते काम माझं नाही, असली नौटंकी मी करत नाही. मी शिवसैनिक असून अॅक्शनवाला माणूस आहे. तेव्हा या ज्या मेंटल केसेस वाढल्या आहेत त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावेत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.