मुंबई । ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, आमचं हिंदुत्व पक्क असून भक्कम पायावर उभं आहे, आमचा आत्मा हिंदुत्वाचा आहे,’ असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात रंगलेल्या लेटरवॉरनंतर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यपालांनी सरकार घटनेनुसार चाललं की नाही, हे पाहायचं असतं,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाच्या मुद्यावरून डिवचत मंदिरं खुली करण्याची मागणी केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उत्तर दिलं. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्राच्या राज्यपालांनी इंग्रजीमध्ये लिहलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी परखड ठाकरी भाषेत उत्तर दिलं आहे आणि मुख्यमंत्र्यानं दिलेले उत्तर हा ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राज्यपालांना सुस्पष्ट, आणि विनम्र भाषेत कसं उत्तर द्यावं असा एक आदर्श असं उदाहरण आहे. मुख्यमंत्र्यांनी शालिनतेच्या, हिंदुत्वाच्या आणि घटनेच्या सर्व मर्यादा पाळून त्यांनी उत्तर दिलेलं आहे. असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर, त्याच्यावर फार चर्चा होऊ नये. राज्यपाल ही आदरणीय व्यक्त आहे त्यांचा आम्हाला सन्मान आहे. असंही ते म्हणाले आहेत.
‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. हे राज्य घटनेनुसार चालतंय की नाही, हे त्यांनी पाहायचं. बाकी इतर गोष्टींसाठी लोकनियुक्त सरकार आहे. ते निर्णय घेत असतं. चीनचं सैन्य लडाखच्या सीमेवर घुसलंय. आता आपल्या सैन्यानं काय केलं पाहिजे, यासंदर्भात राज्याच्या मुख्यंमत्र्यांनी बोलायचं नसतं. देशाचे संरक्षण मंत्री, लष्करप्रमुख, पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी बोलायचं असतं. तसंच, महाराष्ट्रासारख्या राज्यात जी करोनामुळं स्थिती उद्भवली आहे आणि कोणत्या पद्धतीनं अनलॉक करायचं हे लोकनियुक्त सरकार ठरवेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील. त्यांच्यामध्ये तुम्ही हिंदुत्ववादी आहात की नाही, हा प्रश्न कोणाला पडू नये. सरकार घटनेनुसार चाललं की नाही, हे फक्त पाहायला पाहिजे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”