हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं आव्हान केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शहांवर पलटवार करत तुम्ही सीबीआय, एनसीबी आणि ईडीची चिलखते काढा आणि मग आमच्याशी लढा असे आव्हान दिले आहे. तसेच महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांची पुण्यभूमी आहे. तिथे खोटं बोलण्याचं पातक करू नका, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात सरकार उत्तम चालले आहे. केंद्राने प्रयत्न करुनसुद्धा सरकारचा एक कवचासुद्धा उडालेला नाही याचं दुखः आम्ही समजू शकतो. मी सांगतो सीबीआय, एनसीबी आणि ईडीची चिलखते घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरत आहात. हे दूर करा आणि आमच्यासोबत लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत पाठीमागून प्रतिहल्ले करत नाही. समोर लढायचे आम्हाला शिकवू नका,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, अमित शहा यांचे पुण्यातील वक्तव्य पूर्ण असत्य होतं. ते नक्की खरं काय बोलले हे आम्ही शोधतोय. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने कधीच सोडला नाही. २०१४ च्या निवडणुकीवेळी शिवसेनेला दूर करा असे सांगणारे कोण होते. ते अमित शहा होते. २०१४ च्या निवडणुकीवेळी आम्ही वेगळे लढलो होतो. आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही मोठे यश मिळवले. २०१४ पासून महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण होते, असा सावल करत राऊत यांनी अमित शहांना लक्ष्य केलं.