हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने विरोधी बाकावरील अनेक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. महाराष्ट्रातही राजकीय वार पाहून अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये जाणे पसंत केलं. त्यातच आता आपआपल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपात घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार केला आहे. आम्ही ठरवलं तर एक रात्रीत भाजप पक्ष संपवू असं त्यांनी म्हंटल. यासाठी त्यांनी खासदारचं गणितही मांडलं आणि बावनकुळे याना थेट इशारा दिला.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, इतर पक्ष संपवणे शक्य नाही, कारण या देशात लोकशाही आहे. बावनकुळे सांगतात लहान पक्ष संपवा, पण 2024 मध्ये तुमचा पक्ष राहतोय का बघा. 2024 नंतर भाजप राहणार नाही, तर काँग्रेसमय झालेला पक्ष आहे. जर आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल. 303 खासदारांपैकी फक्त 103 खासदार मूळ भाजपचे आहेत, बाकी काँग्रेस आणि इतर पक्षांचे आहेत. या सर्व खासदारांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तर हा देशच भाजप मुक्त होईल हे बावनकुळे याना माहित नसावं असा टोलाही राऊतांनी लगावला.
भाजपची ताकद परावलंबी असून हुकूशाहीविरोधात उभे राहणाऱ्या लहान पक्षांना संपवायचं आणि मोठ्या पक्षांना फोडायचं ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र आणि देशाला घातक आहे. छोट्या पक्षांना संपवण्यावर त्यांचं लक्ष आहे. इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू, प्रादेशिक पक्ष संपवून टाका, ही राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भाषा होती. पण, त्याचं नड्डांना आता लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत. अनेक लहान-लहान पक्ष बरोबर घेऊ त्यांना परत एनडीए उभारणी करावी लागत आहे अस म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.