हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाठीत खंजीर खुपसण्याच्या विधानावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील खडाजंगी अजूनही सुरूच आहे. यावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपने अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधी चा दाखला देत चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवारांना घेऊन त्यांनी सरकार बनवलं ते राजकारण. इतरांनी केलं असतं तर खंजीर खुपसला? असा सवाल संजय राऊत यांनी केला. राजकारणात देशभरात अशा गोष्टी सुरू असतात. मध्यप्रदेशात माधवरावांच्या सुपुत्रांना काँग्रेसपासून फोडलं. ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर खंजीर खुपसला. हे शब्द आता राजकारणात कोणी वापरू नयेत. वापरले जाऊ नयेत. राजकारण गेल्या काही वर्षापासून याच पद्धतीने सुरू आहे. याला पारदर्शक राजकारण म्हणत नाही, असं राऊत म्हणाले.
मी कोणाचा कोथळा बाहेर काढू असं म्हटलंय? ते पाठीत खंजीर खुपसत होते. पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केले आहेत. त्यांना आम्ही शिवचरित्र पाठवू. त्यातल्या एखाद्या शिवचरित्रामधील इतिहासामध्ये कोथळा काढणं म्हणजे नक्की काय याचा त्यांनी अभ्यास केला तर त्याची आम्ही चर्चा करु अस म्हणत आम्ही इतिहास समजून घेतो आणि तो घडवण्याचा प्रयत्न करतो असा टोलाही राऊतांनी लगावला.