हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणूकीला अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. पण भारतीय जनता पक्षाने आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने मिशन मुंबई मनावर घेतली आहे. बिहारमध्ये सत्तेचं कमळ फुलवल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने मुंबई महापालिका सर करण्यासाठी रणनीती आखण्याचं निश्चित केलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा युती करणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चर्चेवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे.
मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर राऊत म्हणाले, जाऊ द्या ना, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल. सध्याच्या स्थितीत काहीही बदल होणार नाहीत. मी नाशिकलाही आता बोलतोय की, पुढचा नाशिकचा महापौर शिवसेनेचाच असेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
तुम्ही कोणतीही हत्यारं वापरा, महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही. आम्ही लढणारे आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने एक पाऊल मागे घेतल्यास सरकारने शरणागती पत्करली असं होत नाही. संविधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी तयार केलेलं नाही. कायदा बदलता येऊ शकतो. यावेळी भाजपवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे बांबू, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’