परभणी प्रतिनिधी : गजानन घुंबरे
राजकारणात कुणी कायमचा शत्रू व मित्र नसतं असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्र राज्याच्या नवीन सरकार स्थापने संदर्भात होत असलेल्या एकूण राजकीय घडामोडी नंतर दिसून येत आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. यावेळी आघाडीचा पाठिंबा घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा निर्णयापर्यंत पोहोचली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला सोबत घेण्यासंदर्भाची भूमिका मागिल काही महिन्यापूर्वीच बदलली होती का? का तो फक्त योगायोग आहे अशी चर्चा आता परभणी जिल्ह्यामध्ये रंगली आहे. त्यावेळी ही बाब कोणीही गांभीर्याने घेतली नव्हती पण आता मात्र तीच चर्चा सगळीकडे रंगली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील तिन्ही प्रमुख पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेनिमित्त २३ ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जाहीर सभेमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी “आज पासून राष्ट्रवादीचा झेंड्यासोबत इथून पुढच्या काळामध्ये भगवा झेंडाही दिसेल “, अशी घोषणा केली होती. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित या सभेपूर्वी पाथरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले होते. यावेळी सभेच्या परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या.
या वातावरणामध्ये अजित पवार यांनी सदरील वक्तव्य केलं होतं. यावर राज्यभर माध्यमांमध्ये चर्चा झाली, तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ते अजित पवार यांचे वैयक्तिक मत असल्याचे व पक्षाची भूमिका नसल्याचे जाहीर केले होते. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे प्रतीक म्हणुन निवडला , हा झेंडा कोणाची मक्तेदारी नसून अजित दादा गैर काय बोलले ? असा प्रश्न करीत अजितदादांच्या भूमिकेला समर्थन दर्शवलं होत.
विधानसभेच्या निवडणूकीनंतर मागील पंधरा दिवसांमध्ये घडत असलेल्या राजकीय हालचालीनंतर अजित पवारांनी परभणीमध्ये केलेले वक्तव्याला आता महत्त्व आलं आहे. निवडणुकांपूर्वीच राष्ट्रवादी पक्षाने भगव्या ध्वजाला आपलंसं करत ‘सॉफ्ट भुमिका’ घेत निवडणुकीपूर्वीच एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता का ? का तो निव्वळ योगायोग आहे ?असा आता प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. जिल्ह्यासह राज्यातील राजकीय जाणकार मात्र हे आधीच ठरलं होतं म्हणुन चर्चा करत आहेत.