महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य, मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर; शिवसेनेचे विरोधकांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकार वर टिकेची झोड उठवली असून निशाणा साधला आहे. यावर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन विरोधकांचा समाचार घेतला आहे. मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे असं शिवसेनेने म्हंटल आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरातील एका महिलेवर बलात्कार झाला. एका नराधमाने त्या महिलेवर निर्घृण हल्ला करून तिला ठार केले. या घटनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का बसला आहे. त्या अभागी महिलेस वाचविण्यासाठी पोलिसांनी व डॉक्टरांनी शर्थ केली, पण पीडितेचा मृत्यू झाला. बलात्कार करणारा नराधम कोणी मोहन चौहान हा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या व त्याच्यावरील खटला ‘फास्ट ट्रक’ कोर्टात चालवून लवकरात लवकर त्याला फासावर लटकवले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य असून असे निर्घृण कृत्य करणारे नराधम कायद्याच्या कचाटय़ातून सुटणार नाहीत. तरीही या सर्व प्रकरणावर राज्यातील विरोधी पक्षाने गदारोळ माजवला आहे. राज्यात कायद्याचे राज्य नाही, कायद्याचा धाक नाही, अशी भाषा विरोधकांनी वापरली आहे. साकीनाक्याच्या आधी अमरावती, पुणे, नागपूर येथे अशा घटना घडल्या आहेत. प्रत्येक घटना ही अस्वस्थ करणारी व संताप आणणारी आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेस कलंक लावणारी आहे. त्याविरोधात लोकांच्या मनात संतापाचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे. अशा घटना घडताच तेवढय़ापुरते वादळ निर्माण होते, मने सुन्न होतात व पुन्हा जगरहाटी सुरूच राहते.

भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे ती चोख बजावली आहे. मुंबई-महाराष्ट्रात महिला कशा सुरक्षित नाहीत असे तो आता ओरडून सांगत आहे. साकीनाक्याच्या घटनेने सगळय़ांनाच धक्का बसला असला तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र साकीनाकाप्रकरणी डोळय़ांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे , पण नक्राश्रू ओघळू लागले की , भीती वाटते , प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होते . पोलिसांना त्यांचे काम करू द्या . तरीही साकीनाका प्रकरणाची फाईलही कुणाला ‘ ईडी ‘ वगैरेकडे सोपवायची असेल तर त्यांना कोण रोखणार ? काय वाट्टेल ते करू द्या. असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे.