हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे हे एक दिवस देशाचे नेतृत्व करतील या भीतीने भाजपनं शिवसेना फोडली असा थेट आरोप शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
सचिन अहिर म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व करत होते. ते जर असेच यशस्वी झाले तर उद्या देशाचं नेतृत्व देखील करतील, ही काहींच्या मनात भीती असल्याने भाजपकडून हे फोडफोडीच षडयंत्र केलं गेलं. पण जनतेला हे आवडलं नसून जनताच याला उत्तर देईल.
दरम्यान, या सर्व घडामोडी सुरू असताना खासदार बारणे यांनी तरी अशा वेळी उद्धव ठाकरेंसोबत रहायला हवं होतं. बारणे यांना उद्धव ठाकरे यांनी मानसन्मान दिला. खासदारकी दिली. त्यांच्या खासदारकी बाबत आम्ही राष्ट्रवादीचा स्पष्ट विरोध केला होता. श्रीरंग बारणे यांनाच आम्ही उमेदवारी दिली. पण आज त्यांनी स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केला ही दुर्दैवी गोष्ट आहे असेही सचिन अहिर म्हणाले.