कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत ; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल असून मागील काही दिवसांपासून दिल्लीबरोबरच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील विविध मुद्यांवरून भाजपा नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. देशात निर्माण झालेल्या करोना परिस्थितीकडे लक्ष वेधत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर टीका केली आहे. तसेच राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीत येऊन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे, असे मतही राऊत यांनी यावेळी मांडले. कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत असेही राऊत म्हणाले.

दिल्ली मध्ये कोरोनाचा कहर का वाढला? तर दिल्ली सरकारने सर्व काही उघडण्याची घाई केली म्हणून. त्या फाजील आत्मविश्वासातून हे संकट वाढले. कोरोना कोणालाही सोडत नाही व तुम्ही कितीही मोठे असलात तरी कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवत नाही. दिल्लीत पुन्हा ‘लॉक डाऊन’ची तयारी सुरू आहे. बाजार, दुकाने, सार्वजनिक स्थळे व प्रार्थनास्थळे पुन्हा बंद केली जातील. हे का घडले याचा विचार महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी करायला हवा.

महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी राज्याची निरंकुश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतिनियमांचे भान ठेवायला हवे. मुंबईत छठपूजेला परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपावाले आंदोलन करीत होते. बिहारची निवडणूक भाजपाने जिंकली हे खरे, पण मुंबईतील बिहारी जनतेस छठपूजेच्या वादात ओढण्याचे कारण नाही. छठपूजेसाठी समुद्रकिनारी एकाच वेळी हजारो लोक गोळा होतात व करोना संकटकाळात ते नियमबाह्य आहे. छठपूजा २० नोव्हेंबरला पार पडली, पण गर्दी जमवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा होताच. मुंबईत ज्यांनी छठपूजेसाठी आंदोलन केले त्यांनी इतर राज्यांत काय घडले ते पाहायला हवे,” असा टोला राऊत यांनी लगावला.

छठपूजा प्रामुख्याने बिहार किंवा उत्तरेत केली जाते. मुंबईत हे लोण तसे अलीकडे आले. मुंबईत छठ पूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपचे नेते करतात. पण गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील भाजप सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेची परवानगी नाकारली हे महाराष्ट्रातील भाजप नेते कसे विसरतात? बिहारमधील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये तेथील प्रशासनाने आदेश काढले की, छठपूजा घरच्या घरीच करा. सांस्पृतिक कार्यक्रमांवर बंदी आणलीच, पण नदीच्या घाटांवर पोलिसांनी घेराबंदी करून ठेवली. रस्त्यांवर वाहनांनी यानिमित्त गर्दी करू नये म्हणून कडक निर्बंध लादले. हे सर्व करताना भाजप हिंदुत्वविरोधी ठरत नाही, पण महाराष्ट्रात भाजपची भूमिका वेगळी.

राऊत पुढे लिहितात की, महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला तो राजकीय होता. मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नाही, त्यामुळे ‘ठाकरे सरकार’ हिंदुत्वाच्या विरोधी असल्याची बोंब ठोकणे हे सरळ सरळ ढोंग आहे. हरयाणात भाजपचे सरकार आहे. तेथे शाळा उघडण्याचा निर्णय घेतला, पण 72 तासांत पाचशेहून जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोनाबाधित झाले.

बिहारात विजय मिळवला म्हणून कोरोनावरही विजय मिळवता येईल असे कोणाला वाटते काय? कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये. भाजपसारख्या पक्षांची तशी इच्छा असेल तर ते राज्याचे दुर्दैव!! असेही संजय राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’