हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याबद्दल मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने बिहार मध्ये लव्ह जिहादवर कायदा करावा, आम्ही त्यानंतर पाहू, असं ओपन चॅलेंज त्यांनी भाजपला दिलं आहे.
हिंदुत्ववादाचं समर्थन करणारी शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत असताना राज्यात लव्ह जिहादचा कायदा लावणार का यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला पेचात टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन पक्ष लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला समर्थन देण्यास अनुकूल नसतील. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘इतर राज्यात कोणता कायदा कसं करतायत हे पाहायचं आहे. खासकरून बिहारमध्ये नितीशकुमार लव्ह जिहाद संदर्भात कोणत्या प्रकारचा कायदा करतायत हे बघून त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू.’ असं म्हणत त्यांनी भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार भाजपच्या सहकार्याने तिथे मुख्यमंत्री झाले आहेत. ते सरकार भाजप चालवत आहेत. त्यांचं सरकार लव्ह जिहाद बाबत जो कायदा करतील त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करु आणि त्यानंतर काय करायचं ते पाहू. भाजपने त्याबाबत बिहारमध्ये एक आदर्श कायदा बनवावा. त्यानंतर महाराष्ट्राला यासंदर्भातील प्रश्न विचारावे. असे संजय राऊत यांनी म्हंटल आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’