ही तर रामनिष्ठा नसून राजनिष्ठा; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येतील जमीन घोटाळ्याविरोधात आवाज उठवला म्हणून भाजपचे नेते शिवसेनेला हिंदुद्रोही आणि राजद्रोही ठरवत आहेत. ही एकप्रकारची विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून या राष्ट्रनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा या मुद्द्यावर भूमिका मांडली असून, सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. “

अयोध्येत राममंदिराच्या जमीन खरेदीवरून वादंग माजले आहे. संजय सिंह हे आप पक्षाचे खासदार. त्यांनी एक प्रकरण समोर आणले. एक जमीन अयोध्येतील, जी दोन-पाच मिनिटांपूर्वी फक्त दोन कोटी रुपयांत खरेदी केली. त्याच जमिनीची किंमत पुढल्या पाच मिनिटाला १८ कोटी रुपये दाखवून राम जन्मभूमी न्यासाने खरेदी केली. हा राममंदिराचा जमीन घोटाळा असल्याचे संजय सिंह यांनी समोर आणले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शिवसेनेसह अनेकांनी केली.

संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत ते हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. धार्मिक स्थळांबाबत घोटाळ्यांची चौकशी करा असे सांगणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणणे ही विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.