हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता . उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला, आणि धोका देणाऱ्याला माफी नसते असं विधान त्यांनी केलं होत. यांवरून सामनातील रोखठोक सदरातून अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली आहे तसेच शिंदे गटाचा उल्लेखही लाचार असा केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा है गणपती दर्शनासाठी मुंबईत आले व त्यांनी शिवसेना द्वेषाचे प्रदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांसमोर त्यांनी बंद दाराआड भाषण केले. विषाला उकळी फुटावी असे त्यांचे वक्तव्य आहे. मुख्य म्हणजे त्यांचे भाषण हे कृतघ्नतेचे टोक आहे. त्यांनी भाषणात सांगितले, शिवसेनेला गाडून मुंबईवर ताबा मिळविण्याची हीच संधी आहे. त्यांचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला व त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी. भाजप शिंद यांच्या गटाबरोबर आहे व राहील. उद्धव ठाकरे यांना आता संपवायलाच हवे.
श्री. अमित शहा याना त्यांचे राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाहीने हा अधिकार सर्वांना दिला; पण भाजप व त्यांचे नेते लोकशाही मागनि जात आहेत काय? हा प्रश्न आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ अस्थिर करून देशाचे नियंत्रण काही मंडळींनी हातात घेतले आहे. त्यांनी एका बाजूला ‘मिशन मुंबई’ तर दुसऱ्या बाजूला ‘मिशन बारामती’चे पड्डु ठोकले आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खतम करायचे व तोतयांच्या हाती हे राज्य सोपवायचे, मुंबईचा सरळ वास गिळायचा असा हा कट शिजला आहे. अमित शहा यांनी ते स्पष्टपणे बोलून दाखवले
2014 साली शिवसेनेने दोन जागांवरून भाजपशी असलेली युती तोडली असा ठपका शहा ठेवतात. मग 25 वर्षांची दोस्ती टिकविण्यासाठी भाजप दोन पावले (जागा) मागे का गेली नाही? बरं, पुढे शिवसेनेबरोबरच सरकार स्थापन झाले. शिवसेनेने लोकसभेत एकत्र यावे म्हणून अमित शहा ‘मातोश्री’वर आले होते व त्यांच्या समोर सत्तेचे वाटप समसमान झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर जाहीर केले होते. त्याच वेळी अमित शहांनी श्री. फडणवीस यांना थांबवले असते तर बरेच झाले असते. म्हणजे धोका कोणी कोणास दिला यावर आजचे साक्षीपुरावे करण्याची वेळच आली नसती… असं शिवसेनेनं म्हंटल.
2014नंतर श्री. अमित शहा यांनी शिवसेना व ठाकरेंवर अनेक विखारी हल्ले केले. “शिवसेना को पटक देंगे’ अशी भाषा वापरली, पण एकनाथ शिंदे यांनी त्या वक्तव्याचा साधा निषेधही केला नव्हता. शिवसेनेचे अनेक नेते व प्रवक्ते ‘पटक देंगे’वर तुटून पडले होते तेव्हा श्री. शिंदे यांचा स्वाभिमान, अभिमान, हिंदुत्व बर्फाच्या गोळ्याप्रमाणे विरघळून गेले. तेव्हाही अमित शहा शिवसेना गाडायला निघाले होते व आजही त्यांचे तेच स्वप्न आहे. दोन्ही वेळेस शिंदे हे अमितभाईंचे हस्तक म्हणूनच काम करीत होते आणि स्वतःची कातडी वाचवत होते असेच दिसते असा आरोप शिवसेनेने केला आहे.
शिंदे गट हा साबणाचा बुडबुडा आहे. शेवटी जेथे ठाकरे तिकडे शिवसेना हेच लोक मान्य करतील. आज सत्तापदे, मुख्यमंत्रीपद आहे म्हणून मुंगळे व माश्या गुळाभोवती आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, दिल्लीच्या आक्रमणाविरुद्ध एकत्र येऊन लढण्याचे ‘मिशन’ राखले तर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत मोठा चमत्कार होईल. नितीश कुमार व यादवांनी उत्तरेचे राजकारण यशस्वी करावे, महाराष्ट्रात ठाकरे-पवारांनी लक्ष द्यावे. ते यशस्वी झाले तर बरेच साध्य होईल. भाजपचे ‘मिशन बारामती चे प्रयोग अनेक वर्षांपासून चाललेच आहेत. ठाकरे-पवारांचे नेतृत्व राहूच नये यासाठी ही धडपड आहे. हा कृतघ्नपणाच आहे असं म्हणत शिवसेनेनं भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधलाय.