हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपाल जात प्रांतात भेदाभेदी करून महाराष्ट्रात व हिंदुत्वात फूट पाडत आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की आणखी काही, असा प्रश्न मराठी माणसाला पडला असेल तर तो चुकीचा कसा म्हणता येईल! असे सामनातून म्हंटल.
राज्यपाल हे एक घटनात्मक आणि प्रतिष्ठेचे पद आहे. अनेक राज्यपालांनी या पदाची प्रतिष्ठा राखत काम केले. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल मात्र यास अपवाद ठरले आहेत. गेल्या साधारण तीनेक वर्षांपासून भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राजभवनात आहेत. या काळात त्यांनी महाराष्ट्र सेवेपेक्षा भाजप सेवाच जास्त केली, पण शुक्रवारी तर त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, अस्मितेवरच घाव घातला. राज्यपालांनी आता असे तारे तोडले की, “मुंबई आणि ठाण्यातून गुजराती व राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर तुमच्याकडे पैसाच उरणार नाही. तुम्ही या मुंबई आर्थिक राजधानी म्हण गुजराती आणि राजस्थानी लोक इथे नसतील तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हणवताच येणार नाही.” राज्यपालांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. लोकांच्या मनात संताप निर्माण झाला आहे.
संजय राऊतांना ED कडून अटक; आज कोर्टात हजर करणार
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/BcfqPV48LT@HelloMaharashtr
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 1, 2022
राज्यपालांचे हे विधान महाराष्ट्राचा अपमान करणारे आहे व एकतर राज्यपालांनी माफी मागावी किंवा केंद्राने त्यांना परत बोलवावे, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली, पण त्यातही अपवाद आहेच. भारतीय जनता पक्ष व सरकारमधील शिंदे गटाने मात्र राज्यपालांच्या मराठीद्रोहावर नाममात्र तोंड उघडले. ते त्यांच्या स्वभावास व लौकिकास धरूनच आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मराठी माणूस व महाराष्ट्राचा अपमान केला, महाराष्ट्रात त्या विधानावरून संतापाचा भडका उडाला. तो भडका व रोष कायम असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडी ने रविवारी पहाटे थाडी टाकून राज्यपालांच्या भीषण वक्तव्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होतेच. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी महाराष्ट्रात अशा कारवाया सुरू आहेत असा आरोप शिवसेनेनं केला.
राज्यपालांनी राजभवनाचे भाजप कार्यालय बनवून ठेवले आहे. अनेक घटनाबाहय कृतींचे ते केंद्र बनले आहे. राज्यपाल हे पूर्वाश्रमीचे संघ प्रचारक आहेत. त्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही, पण राजभवनात बसून सरकार पाडणे, काडया घालणे, वादग्रस्त वक्तव्ये करणे हे योग्य नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिगत आयुष्याची खिल्ली उडविणारे राज्यपाल भाजपास प्रिय आहेत. “रामदासस्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोण विचारतो?” असे म्हणणारा माणूस भाजपने महाराष्ट्रावर राज्यपाल म्हणून लादला व त्याच राज्यपालांनी फुटीर शिवसेना गटास मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आता तर घटनात्मक पदावर बसून मुंबई-महाराष्ट्राच्या नागरिकांत जात-प्रांताची भेदाभेदी करणारी विधाने राज्यपाल कोश्यारी करीत आहेत. हा भाजपचा अजेंडाच आहे अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला.
कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने सगळ्यांचाच सांभाळ केला. राज्यपाल मात्र जात प्रांतात भेदाभेदी करून महाराष्ट्रात व हिंदुत्वात फूट पाडत आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की आणखी काही, असा प्रश्न मराठी माणसाला पडला असेल तर तो चुकीचा कसा म्हणता येईल! गुजराती, राजस्थानी, हिंदी भाषिक लोक यांना वेगळे पाडून भाजपसाठी वेगळी ‘मतपेढी’ करण्याचे काम घटनात्मक पदावरील व्यक्ती करत असेल तर राष्ट्रीय एकात्मतेची ऐशी की तेशी व्हायला वेळ लागणार नाही! असा इशारा शिवसेनेनं दिला.