हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकीच्या निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचार घडून आला. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपला खडेबोल सुनावले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले. आता प. बंगालातही तेच घडले. देशात कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी पडत आहेत. दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता असा सवाल शिवसेनेने केला आहे. प. बंगालात शांतता, कायदा–सुव्यवस्था राखणे हे ममता बॅनर्जींइतकेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य आहे, अशी आठवणही शिवसेनेने करून दिली.
प. बंगालातील हिंसाचाराचे समर्थन कोणीच करणार नाही. निवडणुका संपल्यावर वैर संपायला हवे, पण ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या क्षणापर्यंत राज्यात निवडणूक आयोगाचे, म्हणजे केंद्राचेच राज्य होते व कायदा-सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलाच्या हातात होती. ममता बॅनर्जी यांना काहीच हालचाल करता येऊ नये म्हणून राज्याच्या पोलीस महासंचालकांपासून अनेक अधिकाऱयांना निवडणूक आयोगाने हटवले. मग राज्यातील हिंसाचाराची जबाबदारी नक्की कोणाची?
या हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचे लोक भाजप कार्यकर्त्यांना जागोजाग बदडत असल्याचे सांगितले जात आहे. तो अपप्रचार आहे. बंगालातील हिंसाचारात आतापर्यंत सतरा जण मरण पावले. त्यात नऊजण भाजपशी संबंधित आहेत. उर्वरित मृत हे तृणमूलचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे हल्ले दोन्ही बाजूंनी सुरू आहेत, पण भाजपचे प्रचारतंत्र जोमात असते इतकेच. अनेकांची डोकी फुटली. घरेदारे जाळण्यात आली, असे भाजपतर्फे प्रसिद्ध केले जात आहे. बंगालातील हिंसाचाराने चिंताग्रस्त झालेल्या पंतप्रधान मोदी यांनी तेथील राज्यपाल जगदीश धनगड यांना फोन करून माहिती घेतली.
भाजपचा एक ज्येष्ठ पदाधिकारी थेट हायकोर्टात गेला आणि बंगालातील हिंसाचारास ममता बॅनर्जी जबाबदार असून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी केली. हे असे रडीचे खेळ बंगालात सुरू झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा हे घाईघाईने कोलकात्यात पोहोचले व त्यांनी हिंसाचाराचे खापर ममतांवर फोडले. डॉ. नड्डा हे संयमी नेते आहेत. त्यांचा पिंड आकांडतांडव करण्याचा नाही, पण बंगालचा पराभव पचवता येत नाही. याचे दुःख त्यांच्या मनात खदखदत असेल तर तो मानवी स्वभाव आहे, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे
भाजपचे बंगालचे प्रांताध्यक्ष दिलीप घोष हे प्रचार सभांतून जाहीरपणे काय बोलत होते? ते सांगत होते, ‘‘आम्हीच जिंकणार; आम्ही जिंकल्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना रस्त्यांवर कुत्र्यांप्रमाणे गोळय़ा मारू!’’ संसदेचे सदस्य असलेल्या व भाजपचे राज्यातील नेतृत्व करणाऱया दिलीप घोष यांची ही चिथावणी आहे. हेच दिलीप घोष एके ठिकाणी जाहीरपणे सांगतात की, ‘‘डायरीत लिहून ठेवा, तृणमूल कार्यकर्त्यांना आम्ही सोडणार नाही.’’ म्हणजे भाजपचा विजय झालाच असता तर तृणमूल कार्यकर्त्यांचे रक्ताचे पाट वाहिले असते आणि जीवाची भीक मागणाऱया तृणमूल कार्यकर्त्यांकडे पाहून या मंडळींना आसुरी आनंद मिळाला असता, असा खोचक टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.