हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. “सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एकच असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांनी पुढे असेही सांगितले की, भारतात मुस्लिम व्यक्ती राहू शकत नाही असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही यावरून शिवसेनेने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. मोहन भागवत यांचे विचार झटकण्यासारखे नाही, पण दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना ते मान्य आहे का असा सवाल शिवसेनेने केला.
लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको आहे, असं सांगताना पश्चिम बंगाल, केरळात लोकांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं नाही आणि आता उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजपविरोधी वातावरण तयार होतं आहे, असं शिवसेनेने म्हंटल आहे. लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको आहे हे सरसंघचालकांनी मान्य केले असले तरी त्यांचे राजकीय अंग असलेल्या भारतीय जनता पक्षाने हे स्वीकारले आहे काय?, असा सवाल देखील शिवसेनेने केला आहे.
भागवत म्हणतात, ”भारतात इस्लाम धोक्यात आहे, या भीतीच्या जाळ्यात अडकू नका. कारण धर्म कुठलाही असला, तरी सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष होण्याचे कारण विसंवाद आहे. मुळात हिंदू-मुस्लिम ऐक्य ही संकल्पनाच दिशाभूल करणारी आहे. कारण हिंदू आणि मुसलमान हे एकच आहेत,” असे सरसंघचालक म्हणतात. भारतासारख्या लोकशाही देशात हिंदू किंवा मुसलमान कुणाचाही वरचष्मा असू शकत नाही. वरचष्मा असेलच तर तो भारतीयांचा असेल, असे भागवत म्हणतात; पण सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना हे पटेल काय?,” असा सवाल शिवसेनेनं केला आहे.