लसीकरणाच्या गोंधळावरून सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली – शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना लसीकरणाच्या गोंधळावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली आहे अशा शब्दांत मोदींवर हल्लाबोल केला आहे. फ्रान्स मधील घटनेचा देखील यावेळी संदर्भ दिला आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना त्यांच्याच देशात एका तरुणाने भररस्त्यात श्रीमुखात भडकावली आहे. श्रीमुखात हा सभ्य संस्कारातील शब्द आहे. आपल्या भाषेत ‘थप्पड’ लगावली, थोबाड फोडले, कानफट रंगवले असे बरेच काही सांगता येईल. अध्यक्षांच्या कानफटात भडकावणे हा त्या देशाचाच अपमान आहे. या कृत्याचा निषेधच व्हायला हवा, पण जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी. मॅक्रॉन यांच्याबाबत जे घडले त्याचा हाच संदेश आहे असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये म्हटलं आहे.

आपला देशही या गोंधळापासून मुक्त नाही. लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली आहे अस म्हणत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “हरिद्वार, वाराणसी, पाटणा येथील गंगा प्रवाहात या काळात प्रेतांचे तरंगणे व भडकलेल्या सामुदायिक चिता पाहून लोकांच्या मनात संतापाच्या ठिणग्या उडाल्याच असतील. सारे काही सोसूनही आपल्या देशातील जनता संयमाचा बांध कधी तुटू देत नाही. ऑक्सिजनअभावी आप्त स्वकीयांचे डोळय़ासमोर तडफडून होणारे मृत्यूही आपल्या जनतेने निमूटपणे सहन केले.

कोविडच्या रुग्णांना बेड मिळो न मिळो, औषधांची, इंजेक्शन्सची टंचाई असो, लसीकरणास कितीही कालावधी लागो, पण आपल्या देशातील सोशिक जनता सरकाराविरुद्ध पेटून कधी माथेफिरूसारखी वागताना दिसत नाही” असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment