हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे नुकसान झाले. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या गावात मदत व पुनर्वसनाचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर तळीयेत राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळीये, चिपळूणला भेटी दिल्या. या भेटीवेळी या नेत्यांनी मांडलेल्या भूमिकांवर शिवेसेनं निशाणा साधला आहे. सरकारविरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये असे शिवसेनेने म्हंटल आहे.
तळिये गावाचे पुनर्वसन करू, त्यांना ‘म्हाडा’तर्फे घरे बांधून देऊ, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. किंबहुना तळिये गावच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली जागाही उपलब्ध होत असून म्हाडाचे अभियंते त्यादृष्टीने पाहणीही करणार आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वी तळियेत केंद्रीय मंत्री गेले व जाहीर केले की, ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देऊ. प्रश्न आव्हाड घरे बांधून देतील की केंद्राच्या मदतीने श्री. राणे, हा विषय नाही. या संकटसमयी सरकारविरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये असे शिवसेनेने म्हंटल.
तौकते’ चक्रीवादळात केंद्राने गुजरातला एक हजार कोटींची मदत केली. तशी मदत महाराष्ट्राला करावी व महाराष्ट्राच्या केंद्रीय मंत्र्यांनी या रकमेचा धनादेश केंद्राकडून घेऊन यावा. ‘नुकसानग्रस्तांना ज्या प्रकारची मदत हवी ती केंद्राकडून मिळेल, आम्ही पाहायला आलो नाही, सर्वतोपरी मदतही देणार !’ असे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत व त्यांचे हे विधान समजदार नेत्याचे नाही, पण आम्ही ते चांगल्या अर्थाने घेतो. नुकसानग्रस्तांना, पूरग्रस्तांना सर्वतोपरी केंद्र सरकार मदत करेल, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने करावे का? असा सवाल शिवसेनेने केला.
तळिये चिपळूणपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेडपर्यंत जेथे जेथे जलप्रलयाने नुकसान केले त्या प्रत्येक घरात मदत पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकारला सर्व करावी लागेल. बाकी कुणी या संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल तर तो त्यांचा प्रश्न केवळ पाहायला आलो नाही, तर सर्वतोपरी मदतही देणार, असे विरोधी पक्ष सांगतोय. आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणारया विरोधी पक्षाविषयी आणखी काय बोलावे! असा टोला शिवसेनेने लगावला.