हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील आंबिलओढा परिसरातील अतिक्रमण असणारी घरं हटवण्यासाठी ओढ्यालगत असणाऱ्या घरांवर बुलडोझर चालवला गेला. यावेळी रहिवाशांना घरातून बाहेर काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. प्रशासनाने कोणताही मागचापुढचा विचार न करता गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवला. गरीब रस्त्यावर आले. यावेळी पोलीस आणि रहिवाशांमध्ये एकच झटापट झाली. या सर्व प्रकरणावर शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातुन पुणे महापालिकेतल्या सत्ताधारी भाजप वर सडकून टीका केल आहे.
अनधिकृत, बेकायदेशीर घरांचा आणि झोपड्यांचा प्रश्न मुंबईतच नाही तर पुणे, पिंपरी, चिंचवडसारख्या शहरातही वाढला आहे. पुण्यामध्ये आंबिल ओढ्यालगत असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका कर्मचारी, पोलीस पोहोचले तेव्हा स्थानिक जनता आक्रमक झाली. हे सर्व बिल्डरांच्या आदेशाने सुरू आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुण्याची सूत्रे सध्या बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात गेली आहेत. मुंबईच्याच जमिनी सोन्याच्या भावाने जात नाहीत. उलट पुणे याबाबतीत मुंबईच्या पुढे पाच पावले गेले आहे. आंबिल ओढ्यातील कारवाईने ते पुन्हा सिद्ध झाले.
हा प्रकार धक्कादायक, संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा आहे. पुण्याच्या आंबिल ओढा परिसरातील नागरिकांचा आक्रोश एव्हाना सरकारच्या कानापर्यंत गेलाच असेल. या परिसरातील घरांवर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली व घरे पाडण्यास सुरुवात केली तेव्हा लोक रस्त्यावर उतरून ओक्साबोक्सी रडत असल्याचे चित्रण वृत्तवाहिन्यांनी दाखवले.
पुण्यामध्ये आंबिल ओढ्यालगत असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका कर्मचारी, पोलीस पोहोचले तेव्हा स्थानिक जनता आक्रमक झाली. हे सर्व बिल्डरांच्या आदेशाने सुरू आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. कारवाई होत आहे हे महापालिकेने स्थानिकांना कळविले नाही. शत्रूच्या घरात रणगाडे घुसवावे तसे बुलडोझर घुसविले. पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे.
एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पण आंबिल ओढा गरीबांच्या अश्रूंनी वाहत असतानाही सगळेजण थंड बसले आहेत. बिल्डर जे कोणी आहेत ते आहेत. पण त्यांच्या सोयीसाठी ही निर्घृण कारवाई करण्यात आली आहे असेही सामनातून म्हंटल.