मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच ; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण तापलं आहे. अर्णबच्या अटकेनंतर सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर भाजप कमालीचा आक्रमक झाला असून ठिकठिकाणी ते आंदोलन करत आहेत. यावरुन राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेने ‘सामना’ (Saamana) या त्यांच्या मुखपत्रातील अग्रलेखाद्वारे भाजपला खडेबोल सुनावलं आहेत. मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

काय लिहिलं आहे सामना अग्रलेखात

गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही. ही ‘ट्रम्प’ संस्कृती हिंदुस्थानात कोणी रुजवत असेल तर त्यांनी अमेरिकेत सुरू झालेल्या अराजकाकडे डोळसपणे पाहायला हवे. तसे अराजक कोणाला हिंदुस्थानात हवे आहे काय? राजकारणात देशाचे वाटोळे होऊ नये, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा सदोष मनुष्यवध घडू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा. मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे!

आत्महत्येस प्रवृत्त करणे व त्यातून आत्महत्या घडणे हा एक प्रकारे सदोष मनुष्यवधासारखाच गुन्हा आहे. असा गुन्हा करणारी व्यक्ती लहान असो की मोठी, त्याच्यावर कायद्याने कारवाई व्हायलाच हवी, पण भारतीय जनता पक्षाला असे कायद्याचे राज्य मान्य नाही मुळात त्यांना कायदाच मान्य नाही असे भरकटलेले वर्तन ते करीत आहेत. महाराष्ट्रात 2018 साली एका माय-लेकरांनी आत्महत्या केली. तत्कालीन सरकारने ते प्रकरण दडपले.

मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या संशयित आरोपीचा निकाल रस्त्यावर उतरून कसा काय होऊ शकतो? गुजरातमध्ये गोध्राकांड व इतर प्रकरणांत अमित शहांपासून अनेक भाजप नेत्यांना तत्कालीन सरकारच्या कारवाईस सामोरे जावे लागले. या सर्व कारवाया सूडाच्याच होत्या असे शहा यांचे म्हणणे असले तरी त्यासाठी भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलने केली नाहीत व कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही. न्यायालयीन डावपेचातून श्री. शहा सुटले आहेत. तेव्हा तर श्रीमान मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी तेव्हा संयम राखला, त्याचे फळ त्यांना मिळाले.

भाजपवाल्यांचे डोके इतके कामातून गेले आहे की, दिल्लीच्या रस्त्यांवर श्री. उद्धव ठाकरे व इंदिरा गांधी यांची पोस्टर्स चिकटवून आणीबाणीची आठवण लोकांना करून दिली जात आहे. हा बालिशपणा तर आहेच, पण अज्ञानसुद्धा आहे. इंदिरा गांधींशी तुलना होणे ही गौरवाचीच बाब आहे. ‘हिंदुस्थान’च्या फाळणीचा सूड याच पोलादी स्त्रीने पाकिस्तानची फाळणी करून घेतला. असे धाडस पाकिस्तानच्या बाबतीत एकाही ‘मर्द’ म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यास दाखवता आले नाही. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव जरूर झाला, पण त्याच इंदिरा गांधींना देशाच्या जनतेने पुन्हा विजयी केले. देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजींनी शेवटी प्राणाचे बलिदान दिले. असा दुर्दम्य त्याग नंतर एखाद्या तरी पंतप्रधानाने केला असेल तर दाखवा. त्यामुळे भाजपने दिल्लीच्या रस्त्यावर इंदिराजी व उद्धव ठाकरे यांचे एकत्र चेहरे लावले असतील तर त्याचे स्वागत आहे. यानिमित्ताने त्यांनी पाळण्यात बसून पुन्हा इतिहासाचे वाचन केले तर बरे होईल. म्हणजे सदोष मनुष्यवध प्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ दंडास काळ्या पट्ट्या आणि पायांत गुलामीचे घुंगरू बांधून नाचायची वेळ येणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment