….म्हणून भाजपने ओवेसींच्या जागी KCR यांना उतरवले? ठाकरे गटाने सांगितला राजकीय डाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असदुद्दीन ओवेसींचा डाव लक्षात आल्याने मुस्लिम व दलित हे एमआयएमच्या कच्छपी लागणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपने आता ओवेसी यांच्या जागी केसीआर यांना उतरवले आहे काय ? केसीआर व त्यांचा पक्ष भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय ? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. गेल्या काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रात झालेला शिरकाव आणि काल त्यांनी पंढरपुरात विठुरायाचे दर्शन यानंतर सामनातून केसीआर यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल आहे?

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती असा पक्ष स्थापून राष्ट्रीय राजकारणात येण्याचे नक्की केले. खरं तर त्याची गरज नव्हती. त्यांचा एक प्रादेशिक पक्ष होता व त्यांचे उत्तम चालले होते, पण राष्ट्रीय राजकारणाचा किडा राव यांच्या डोक्यात घुसला तो घुसलाच. तेलंगणा राज्य स्थापनेत के. चंद्रशेखर राव यांचा संघर्ष मोठा आहे. राव यांनी संघर्ष केला नसता तर तेलंगणा राज्य निर्माण झाले नसते हे तितकेच खरे. राव हे तेलंगणाचे दोनवेळा मुख्यमंत्री झाले. तेथील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणाऱ्या अनेक योजना त्यांनी यशस्वीरीत्या राबवल्या. तरीही आता त्यांच्या पक्षाला तेलंगणात घसरण लागली आहे व 2024 मध्ये केसीआर यांचा पक्ष सत्तेत राहील की जाईल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत केसीआर यांच्या कन्या कविता यांचा पराभव झाला. याच कविता यांना दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने चौकशीसाठी पाचारण केले. दिल्लीतील ‘आप’चे सरकार व तेलंगणातील काही मद्य ठेकेदार यांच्यात मध्यस्थाची भूमिका कविता यांनी बजावली व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी ‘केसीआर’ यांच्या कन्येवर चौकशीचा ससेमिरा लावला. केंद्रीय तपास यंत्रणा दबावाचे राजकारण करीत असल्या तरी आम्ही त्यांच्यापुढे झुकणार नाही, लढत राहू, अशी गर्जना केसीआर यांनी केली. मात्र त्यानंतर ते जी राजकीय पावले टाकत आहेत ती भाजपास अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचीच आहेत.

तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे आणि 2019 सालापासून भाजप ज्या ‘एमआयएम’च्या ओवेसींचा वापर मतविभागणीच्या कामासाठी करून घेत आहे, त्या ओवेसी यांचे ‘हेडक्वॉर्टर’ सुद्धा हैदराबादच आहे. ओवेसी हे मतांचे विभाजन करण्यासाठी तेव्हा महाराष्ट्रात व इतर राज्यांत गेले. त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, पण आता ओवेसींचा डाव लक्षात आल्याने मुस्लिम व दलित हे एमआयएमच्या कच्छपी लागणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपने आता ओवेसी यांच्या जागी केसीआर यांना उतरवले आहे काय ? केसीआर व त्यांचा पक्ष भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय ? असा प्रश्न पडला आहे. शरद पवार यांनीसुद्धा तसे बोलून दाखवले आहे. भाजपला स्वतःचे विचार व जनाधार नाही. त्यामुळे असे मदारीछाप खेळ करून जिंकायचे हाच त्यांचा मुख्य उद्योग. केसीआर यांचाही वापर त्याच पद्धतीने होताना दिसत आहे असं सामनातून म्हंटल आहे.

केसीआर हे काल त्यांच्या 600 वाहनांच्या ताफ्यासह महाराष्ट्रात आले. त्यांचा ताफा पंढरपुरात आला व त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. केसीआर यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ विठ्ठल- रखुमाईचे दर्शन घेणार, मंदिरावर पुष्पवृष्टी करणार वगैरे बातम्या आधी प्रसिद्ध झाल्या होत्या. हे सगळे आश्चर्यकारक आहे. वास्तविक केसीआर हे महाराष्ट्राच्या सीमेवरच असतात. अनेक वर्षे ते सत्तेत आहेत. मात्र इतक्या वर्षांत त्यांच्यातील विठ्ठलभक्तीची ऊर्मी कधी उसळून आली नाही, पण 2024 च्या निवडणुकांना सामोरे जाताना ती आली. केसीआर यांच्या कर्तबगारीविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही, पण ते ज्या प्रकारचा डाव खेळू पाहत आहेत तो त्यांचा डाव नसून दुसरेच कोणीतरी त्यांना वापरून घेत आहे. त्यामुळे तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही असा स्पष्ट इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.