मुंबई प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांनी आज मालाड येथील हॉटेल ‘रीट्रीट’मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या आमदारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. ‘आमदारांनी कसलीही चिंता करू नये. महाराष्ट्रात आपलंच सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्रीही आपलाच होणार आहे,’ अशी ग्वाही उद्धव यांनी दिली.
‘तुमच्याशी बोलता यावं म्हणून केवळ सर्वांना एकाच ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. तुमच्यावर अविश्वास दाखवण्याचा अजिबात प्रश्न नाही,’ असा विश्वास उद्धव यांनी आमदारांना दिला. त्याचबरोबर, युती अजून तुटलेली नाही,’ असंही उद्धव यांनी सांगितलं.
राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या आमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी राज्य भाजपनं बोलावलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सायंकाळी चार वाजता पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे. त्यात जो निर्णय होईल, त्याची माहिती दिली जाईल,’ असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर सांगितलं. या बैठकीत विरोधी पक्षात बसण्याबाबतही चर्चा झाली असून त्याबाबत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही कळवण्यात आल्याचं समजतं. या माध्यमातून भाजपनं शिवसेनेला एक प्रकारचा अल्टीमेटम दिल्याचीही चर्चा आहे.