औरंगाबाद – मामाकडे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे मूळ गावातील मुलाशी प्रेमसंबंध जुळले, प्रेमाच्या आणाभाका घेऊन झाल्या. अल्पवधीतच दोघांनी 5 एप्रिल रोजी पलायनही केले, त्यानंतर मुलगी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील गावी परतली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याने संबंधित विधीसंघर्ष बालकाविरोधात पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा पुंडलिकनगर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे, ही माहिती पोलिस निरीक्षक दिलीप गांगर्डे यांनी दिली.
विश्रांतीनगरमध्ये मामाकडे राहण्यास असलेली 14 वर्षांची मुलीचे 5 एप्रिल रोजी सायंकाळी अपहरण करण्यात आल्याची तक्रार मुलीच्या आजीने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीच्या तपासात मुलीचे गावातीलच एका अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली. चार दिवस दोघे सोबत होते. त्या कालावधीत दोघांमध्ये शारीरीक संबंध प्रस्थापित झाले. 9 एप्रिल रोजी विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या भावाने पुंडलीकनगर पोलिसांना मुलगी व मुलगा गावी परतल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी रविवारी सकाळी पुंडलिकनगर ठाणे गाठत तीन जणांनी अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याची तक्रार केली.
पुंडलिकनगर पोलिसांनी महिला व बालकल्याण समितीच्या समोर अल्पवयीन मुलीचा सविस्तर जबाब नोंदविला. मुलगी स्वखुशीने मुलासोबत गेली होती. तसेच त्या मुलासोबतच लग्न करायचे असल्याचे जबाबात म्हटले आहे. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त मुलाच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. त्याशिवाय मुलीच्या वडिलांचा आक्षेप असलेल्या दोन मुलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याचा या प्रकरणात सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोडून देण्यात आले.