औरंगाबाद – चिमुकल्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून तब्बल दीड लाख रुपयात विकत घेऊन त्यांना मारहाण करत भीक मागवण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या मायलेकी ला मुकुंदवाडी पोलिसांनी काल अटक केली जनाबाई उत्तम जाधव (59) आणि सविता संतोष पगारे(33, दोघी रा. रामनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. या प्रकरणामुळे औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संजयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते देवराज वीर यांना नातेवाईक महिलेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रामनगर येथे आरोपी महिला जनाबाई जाधव व सविता पगारे या दोन्ही पाच वर्षाच्या मुलाला गेल्याने मारहाण करीत होत्या. ही माहिती समजताच वीर यांनी त्यांच्या तावडीतून चिमुकल्यांची सुटका केली. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानुसार पोलिसांनी दोन्ही महिलांचा पीडित मुलाला पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्या ठिकाणी बालकल्याण संरक्षण कक्षाच्या महिला अधिकारी ॲड. सुप्रिया इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बाजारे, कैलास पंडित यांनी पीडित मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, आरोपी महिलांनी भीक मागण्यासाठी आम्हाला विकत आणले आहे. तसेच भीक मागण्यासाठी नकार दिल्यास त्या आम्हाला मारहाण करीत असल्याचे पीडित मुलांनी सांगितले. यानंतर वीर यांच्या फिर्यादीवरून दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोघींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत बराटे करीत आहेत.
दीड लाखात दोन चिमुकल्यांना घेतले विकत –
पोलिसांनी आरोपी महिलांची चौकशी केली असता, त्यांनी पाच वर्षाच्या मुलाला 50 हजारात आणि जालना च्या दोन वर्षाच्या मुलाला एक लाख रुपयांमध्ये त्यांच्या आई-वडिलांकडून विकत घेतल्याची माहिती त्या महिलेने दिली. मुलांना विकत घेतल्याचा लेखी करारही शंभर रुपयाच्या बॉंडपेपरवर झाला असल्याची माहिती आरोपी महिलांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस बॉंड वरील साक्षीदाराला सह यात आरोपी आणखी कोणी आहे का याचा तपास करीत आहेत.