नांदेड – जिल्ह्यातील माजी सैनिक नारायणराव साबळे यांना त्यांच्या पुढच्या मुलाने मारहाण केली. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यातील अर्धापूर येथील लहुजी नगर येथे धक्कादायक घटना घडली या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून नारायणरावांचा मुलगा विजय याला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 6 नोव्हेंबर रोजी नारायणराव साबळे (80) व त्यांचा मुलगा विजय (40) यांच्यात वाद झाला. यावेळी विजयने नारायणराव यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. यात नारायणराव गंभीर जखमी झाले. त्यांना मुलगा दिलीप अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी दिलीप साबळे यांनी अर्धापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून विजय साबळे, शुभम साबळेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक जाधव करीत आहेत.