बारामतीत धक्कादायक प्रकार : महिलेला सैतानाचा अवतार म्हणत नग्न करून बळी देण्याचा प्रकार

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात अंधश्रध्देचे अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासरच्या चारजणांसह मात्रिकांवरही गुन्हा बारामती पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. घरातील महिलेला सैतानाचा अवतार समजत मांत्रिकाच्या सल्ल्याने तिला नग्न करण्यात येवून अघोरी कृत्य करून तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने बारामती तालुका हादरला आहे. बारामती तालुक्यातील करंजेपूल येथे ही घटना घडली आहे.

या प्रकरणी पाचजणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड (सर्व रा. करंजेपूल, ता. बारामती), नणंद निता अनिल जाधव (रा. चाकण, ता. खेड) व तात्या नावाचा मांत्रिक (नाव, पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. करंजेपूलला राहणाऱ्या महिलेने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटले आहे की, महेंद्र व राजेंद्र हे महिलेचे दीर असून कौशल्या या सासू आहेत. फिर्यादीचा विवाह झाल्यापासून सासू व दीराकडून लग्नात हुंडा देण्याच्या कारणावरून महिलेचा छळ केला जात होता. वारंवार मारहाण व जाचहाट केला जात होता. नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही त्यांना भरीस घातले. दोन्ही दीर व सासूने तिला भूतबाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले. त्याने सांगितल्यानुसार आरोपींकडून लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले.

सैतानाचा अवतार म्हणत बळी देण्याचा प्रयत्न

फिर्यादीला मुलगी झाल्यानंतर सासूने तु पांढऱ्या पायाची असून आमच्या घरी राहू नको, असे म्हणत तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. 15 ऑक्टोबर 2021 रोजी दोन्ही दीर व सासू यांनी घरात कोणीही नसल्याचे पाहून तिला मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आपडून लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देवू असे म्हणत तिचा गळा जाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला.

महिलेच्या रडण्याने शेजाऱ्यांनी सुटका केली

फिर्यादीने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्याच दिवशी दीर व सासूने तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावून घेतले. हळदी-कुकंवाचे रिंगण करत त्यात फिर्य़ादीला बसवून नग्न करून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले. दीर व सासूने तिच्या तोडात कापसाचा बोळा कोंबून तिला डांबून ठेवले. हा प्रकार पती व मुलाला सांगितले तर तुला मारुन टाकू अशी धमकी दिली. फिर्यादीच्या रडण्याने शेजारी राहणाऱ्यांनी तेथे येत तिची सुटका केली. त्यानंतर फिर्यादीने ही घटना आई-वडिलांना कळवली. बारामतीत येत सासरच्या लोकांसह मांत्रिकाविरोधात तिने फिर्य़ाद दिली. बारामती शहर पोलिसांनी हा गुन्हा फिर्यादी वडगाव निंबाळकर येथील रहिवाशी असल्याने गुन्हा वर्ग केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करत आहेत.

You might also like