सांगली | सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्याच्या छतावरच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतुल विलास गर्जे-पाटील असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अतुल याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार होळकर यांच्या निदर्शनास आली. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, अतुल याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठी पोलिसांच्या हाती लागली आहे. यामध्ये महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.
अतुल गर्जे-पाटील हा 2015 सालापासून सांगली शहर पोलीस ठाण्यात शिपाई या पदावर कार्यरत होता. अतिशय मितभाषी असा स्वभाव अतुल याचा होता. आज नेहमी प्रमाणे सकाळी पोलीस ठाण्यात कामासाठी आला. साफसफाईचे काम आटोपून तो तेथून निघून गेला. त्याने पोलीस ठाण्याच्या छतावर जाऊन द्राक्षांवर फवारण्यात येणारे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल होळकर हे त्यांना घेऊन छतावर गेले असता त्यांना अतुल हा एका कोपऱ्यामध्ये पडलेला दिसला.
पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांनी त्याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोरे, अमित पाटील यांच्यासह संपूर्ण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान, अतुल याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिट्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. यामध्ये महिला सावकार सुवर्णा माणिक पाटील यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. सुवर्णा पाटील या महिला सावकारांवर यापूर्वी सावकारकीचे गुन्हे दाखल आहेत.