नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन श्रीनिवास पाटील थेट दिल्लीला; नितिन गडकरींची तातडीने भेट घेऊन केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील नुकसानग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करुन थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. आज पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात रस्ते व पूलांचे नुकसान झाले आहे. हे सर्व प्रत्यक्ष दौरा करुन पाहिल्यानंतर पाटील यांनी थेट दिल्ली गाठत गडकरी यांची भेट घेतली आहे.

सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांसह, रस्ते, पूल व नाल्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेले दोन दिवस महाबळेश्वर, वाई, सातारा, जावली, पाटण व कराड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करुन पाटील यांनी माहिती घेतली होती. त्याबाबत आज दिल्ली येथे नितीन गडकरी यांची तात्काळ भेट घेत त्यांनी काही महत्वाच्या मागण्यांचे एक निवेदन गडकरी यांना दिले आहे.

https://www.facebook.com/353804234638468/posts/4597979120220937/

तसेच भेटीदरम्यान नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती त्यांना दिली. अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील रस्ते व पूल तुटल्याने नागरिकांचे हाल होत असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्ते व पूलांची कामे तातडीने होणे आवश्यक असल्याचे सांगितले. अनेक पूल हे जुन्या पद्धतीचे, कमी उंचीचे असल्याने अतिवृष्टीच्या परिस्थितीत धोकादायक बनतात. या मार्गावरील दळणवळण ठप्प झाल्याने पावसाळ्यात नागरिकांचा सतत संपर्क तुटत असतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलांची पुनर्बांधणी व काही ठिकाणी नवे पूल होणे गरजेचे आहे.

यातील काही पूल हे तातडीने केंद्रीय रस्ते निधी (CRIF) मधून करावे अशी विनंती खासदार पाटील यांनी यावेळी केली. त्यामुळे विस्कळीत झालेली दळणवळण सुविधा पुन्हा प्रस्थापित होतील व भविष्यात अशा अतिवृष्टीत सुद्धा वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाही असं पाटील म्हणाले.