टीम हॅलो महाराष्ट्र । काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन ट्विट केलं होतं. भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याच्या सर्व नियमांचे तसेच पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन होत असल्याचे खान म्हणाले होते. बॉलिवूड गायक अदनान सामीने त्यांना उत्तर दिलं आहे.
भारतातील मुस्लीम आनंदी जीवन जगत आहेत, सुधारित नागरिकत्व कायद्यातंर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून धार्मिक छळामुळे भारतात आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या देशातील निर्वासितांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी सूचना सामीने खान यांना केली आहे.
‘प्रिय पाकिस्तान नागरिकांनो, जे स्वत:हून सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी चर्चेत सहभागी झाले आहेत… जर तुम्ही मुस्लिमांची बाजू मांडत आहात तर सर्वात आधी मान्य करा की त्यांना तुमचा देश सोडायचा होता. यासोबत ते तुमचे अस्तित्वच नाकारत आहेत. दुसरी गोष्टी म्हणजे जर तुम्हाला मुस्लिमांची इतकीच चिंता आहे तर मग तुमच्या सीमारेषा त्यांच्यासाठी सुरु करा अन्यथा शांत राहा’ असे अदनानने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यानंतर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये ‘भारतातील मुस्लीम समुदाय खूप आनंदी आणि आदराने भारतात राहत आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटेल’ असे म्हणत सामीने इम्रान यांना टोला लगावला आहे.