हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे आता राष्ट्रवादीत ‘पिंगा’ घालणार आहेत. वैशाली माडे या ३१ मार्च रोजी मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. दुपारी १२ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी माहिती दिलीय.
याबाबत वैशाली माडे याना विचारले असता त्यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. ‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्यानं वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे.
वैशाली माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास मोठ्या संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे झाला आहे. त्यांचं माहेरचं नाव वैशाली भैसने. बालपणी गरिबीमुळे त्यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्यात. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी त्यांच्यातील गायिका जिवंत ठेवली. पुढे त्यांचं लग्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे अनंत माडे यांच्याशी झालं. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पतीचाही मोठा वाटा आहे.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीनं आपली चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडी अधिक सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून जनमाणसात अधिक ताकदीने जाण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. माडे या पक्षाचं संघटन काहीसं कमकुवत असलेल्या विदर्भाचं प्रतिनिधित्व करतात. शिवाय त्यांची पार्श्वभूमी ही संघर्ष आणि वंचित समाजातील असल्याने येथे पुढे काम करण्यास स्कोप मिळू शकतो. गेल्या अनेक दिवसांत अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीत प्रवेश केला आहे. माडे यांनी प्रवेश करावा यासाठी दोन ते तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. अखेरीस माडे यांच्या होकारानं आता त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page