टीम, HELLO महाराष्ट्र। देशात नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर त्याचे देशभर पडसाद उमटताना दिसत आहेत. अनेक राज्यांमधून या कायद्याला विरोध होत असून, नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. तर विरोधी पक्षाकडूनही याच मुद्यावरून सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी केलेल्या टीकेला आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले असून, सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व विधेयकावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप सीतारमण यांनी केला आहे.
संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडल्यापासूनच विरोधी पक्षकाडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर नागरिकांनीही रस्त्यावर उतरून मोठा विरोध दर्शविला आहे. तर सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित करत ‘ जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत असल्याचा’ आरोप केंद्र सरकारवर केला आहे. या आरोपाला आता भाजपकडून प्रतिउत्तर देण्यात आलं आहे.
सोनियांच्या आरोपाला प्रतिउत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, देशातील नागरिकांनी हिंसाचार आणि भीती पसरवणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. देशातील जनतेने कोणत्याही भीतीखाली राहू नये. सोनिया गांधी ह्या चुकीच्या पद्धतीने CAA ची तुलना NRC सोबत करीत असून, ज्याचा मसुदा अद्याप तयार झाला नाही. तसेच सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व विधेयकावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप सुद्धा सीतारमण यांनी केला आहे.