हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे बिघडली असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असे विधान भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हंटल आहे. दरेकरांनी पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांच्या घरी शिवसेनेने घातलेला वेढा आणि मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यावरून सरकारवर तोफ डागली आहे
सध्या राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. मोहित कंबोज रस्त्यावरून जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.. सत्तेचा उन्माद आणि वापर करुन राज्यात अशी गुंडगिरी कधीच झाली नव्हती. सरकार असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच कायदा हाती घेतला आहे. अशावेळी मुख्यमंत्री याबाबत का हस्तक्षेप करत नाहीत असा सवाल दरेकरांनी केला आहे
ज्या पक्षाचे मुख्यमंत्री, त्या पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या डोळ्यादेखत गुंडगिरी करत आहेत आणि यावर शिवसेनेचे नेते याचे समर्थन करत असून अशावेळी समोरचे कार्यकर्ते काय हातावर हात ठेवून बसणार नाहीत, दुसऱ्या बाजूनेसुद्धा प्रतिहल्ला होईल. भाजपाचा संघर्षाचा इतिहास आहे त्यामुळे आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजपा शांत बसणार नाही असा इशारा दरेकर यांनी सरकारला दिला