औरंगाबाद – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असताना शहर बस सेवेतील कर्मचारी देखील त्यात सहभाग झाल्याने शहरवासीयांचे अतोनात हाल होत आहेत. मनपा प्रशासन शहर बस सेवा सुरू करण्यासाठी आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु अद्यापही मनपाच्या ‘स्मार्ट’ प्रशासनाला यावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही.
औरंगाबाद मनपाने एसटी महामंडळास सोबत स्मार्ट सिटी बस चा करार केलेला आहे. या कराराअंतर्गत 110 चालक आणि वाहक स्मार्ट बस चालवण्यासाठी एसटी महामंडळाकडून घेण्यात आले आहेत. कोरोना संसर्गामुळे 14 महिने मध्यंतरी स्मार्ट बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र ऑगस्टमध्ये ही बससेवा पुन्हा सुरू झाली बसच्या फेऱ्या ही टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आल्या. त्यानुसार 27 ऑक्टोबर पर्यंत 43 बसेस सुरू होत्या. दररोज शहरासह ग्रामीण भागात सुमारे तीन ते चार हजार प्रवासी त्या बसमधून प्रवास करतात. मात्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 28 ऑक्टोंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात स्मार्ट सिटी चे 110 चालक व वाहक देखील सहभागी झाले आहेत त्यामुळे स्मार्ट बस सेवा अचानक ठप्प झाली आहे.
यामुळे स्मार्ट सिटी बस प्रशासनाला दिवसाकाठी सुमारे पावणे तीन लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच यामुळे दररोज बस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांना नाहक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे मनपाने काहीतरी तोडगा काढून लवकरात लवकर शहर बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून केली जात आहे.