हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यातील शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या विधानावरून बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बबन थोरात यांच्या म्हणण्यानुसार हल्ला करणाऱ्या लोकांचा सत्कार उद्धव ठाकरे करत असतील, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हंटल.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, या हल्ल्याचा जितका निषेध करावा, तितका कमी आहे. ही तत्वाची लढाई आहे, पक्षाची लढाई आहे. ती निश्चित लढावी. पण असा हल्ला करणं चुकीचं आहे. असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असेल तर नाईलाजाने आम्हालाही त्यांच्या आमदारांवर नेत्यांवर हल्ले करावे लागेल. एका कडून मारायचं आणि दुसऱ्याकडून बघायची भूमिका घेतल्या जाऊ शकत नाही. यातील दोषींवर कारवाई करायला हवी असे सत्तार म्हणाले.
दरम्यान, दिसेल तिथे आमदारांच्या गाड्या फोडा, त्यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल असं शिवसेना नेते बबन थोरात यांनी म्हंटल होत त्याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारलं असता, उद्धवजींनी बबन थोरात याना असं बोलायला सांगितलं का तुम्ही असं बोला आणि मग लोकांमध्ये चेतावणी येईल आणि मग लोक असं करतील असं पक्षाचा प्रमुख बोलत असेल तर मग उद्धव ठाकरेंवर कारवाई करावी लागेल. असं मोठं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं. त्यामुळे शिवसेना नेते यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहायला हवं.