सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज आठ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. तर ३३ नव्या रूग्णांची भर पडली. एकूण करोना बळींची संख्या आता ११५ झाली आहे. तर करोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार २२१ वर पोहोचली आहे.
तर जिल्हा ग्रामीणमध्ये आज दुपारपर्यंत दोन नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील एकूण रूग्णसंख्या ८२ झाली आहे. यात सहा मृतांचा समावेश आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यात मिळून एकूण मृतांचा आकडा आता १२१ वर पोहोचला आहे. तर रूग्ण संख्याही १ हजार ३०३ इतकी झाली आहे.
आज सायंकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार करोनाबाधित सहा पुरूष व दोन महिला रूग्णांचा मृत्यू झाला. तर १३ महिलांसह ३३ नव्या रूग्णांची नव्याने भर पडली. काल रविवारी सायंकाळपर्यंत २४ तासांत १३ रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ८ रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे करोना विषाणूचे भयसंकट चिंताजनक ठरले आहे.
आज सोलापूर शहरातील ५५ तर ग्रामीण भागातील २५ रूग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील मिळून ७१५ रूग्णांनी करोनावर मात केली. त्याची टक्केवारी ५४.८७ इतकी आहे.एकीकडे नवे रूग्ण व मृतांची संख्या वाढत असताना करोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वाढले आहे, हे चित्र आश्वासक मानले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.