पुणे प्रतिनिधी । कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नवीन वादविवादाला तोंड फुटत आहे. पुणेरी पाट्या वापरून चंद्रकांत दादांना कोंडीत पकडणाऱ्या कोथरुडकर नागरिकांनी ब्राह्मण महासंघाद्वारेसुद्धा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविला आहे. मेधा कुलकर्णींना तिकीट नाकारलं जाणं हा महिला वर्गाचा अपमान समजून संभाजी ब्रिगेडने सोनाली ससाणे यांना चंद्रकांत पाटील यांच्यसरोधात उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व लोकांमध्ये सोनाली उमेश ससाणे आणि लक्ष्मी दुधाने या दोनच महिला असून यातील लक्ष्मी दुधाने माघार घेण्याची शक्यता आहे.
ब्राह्मण्यवादावर आणि सनातनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम ताशेरे ओढणाऱ्या संभाजी ब्रिगेडने उच्चविद्याविभूषित असणाऱ्या सोनाली ससाणे यांना उमेदवारी देऊन महिला वर्गाची मते स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे. महिला असण्यासोबतच स्थानिक उमेदवार असण्याचा फायदाही ससाणे यांना मिळू शकतो. याच मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांनी अर्ज भरला असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे.