हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|खटाव तालुक्यातील पुसेसावळी प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या तपासात पोलिसांना महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्या पुरव्यासदर्भात पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दंगलीच्या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास सुरू असून, त्याबाबतचे ठोस पुरावे संकलित करण्यात येत आहेत. या पुराव्यांची मांडणी न्यायालयासमोर करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक शेख म्हणाले की, या प्रकरणाचा तपास करत संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांना चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेत आणण्यात आले आहे. याविषयी आताच फार काही सांगता येणार नाही. या प्रकरणी ठोस पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.
पुसेसावळीतील आणखी एक अटकेत; उद्यापर्यंत पोलिस कोठडी
आक्षेपार्ह पोस्टनंतर पुसेसावळी येथे जमावाने केलेल्या तोडफोड, जाळपोळ आणि हत्येप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकास अटक केली आहे. राहुल कदम ऊर्फ आर. के. (रा. पुसेसावळी) असे त्याचे नाव असून, त्याला न्यायालयाने उद्या दि. 18 रोजी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 20 जणांना अटक करण्यात आली असून, त्या सर्वांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
‘त्या’ 16 जणांना कळंबा कारागृहात नेण्यात येणार…
पुसेसावळी येथील दंगल आणि नूरहसन शिकलगार यांच्या हत्येप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यातील 23 जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील 16 जणांच्या गुन्ह्याचा तपास औंध पोलिस ठाण्याच्या अंतर्गत आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणण्यासह दाखल असलेल्या गुन्ह्यात एकूण 16 जणांना काल वडूज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी अटकेत असणाऱ्या 16 जणांना 30 सप्टेंबरअखेर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. औंध पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयितांना अतिरिक्त पोलिस संरक्षणासह कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात नेण्यात येणार आहे.