बॉलिवूड कट्टा | विभावरी विजया नकाते
हिंदी सिनेसृष्टीत तब्बल ५० वर्षे १०० हुन अधिक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनांवर राज्य करणारा अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बॉलिवूडचा रोमँटिक चॉकलेट बॉय म्हणून आपली ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणजे ऋषी कपूर. हिंदी चित्रपटसृष्टिवर प्रेम करणाऱ्या सगळ्या चाहत्यांना मागील आठवड्यात सलग दोन मोठे आणि अनपेक्षित धक्के पचवावे लागले. लागोपाठ दोन सुपरस्टार्सना या चित्रपट जगताने गमावलंय. इरफान खानच्या अचानकपणे आपल्यातून निघून जाण्याचा धक्का अजूनही काही प्रेक्षकांना सहन करता आला न्हवता की तितक्यात ऋषी कपूर या अभिनेत्यालासुद्धा आपण गमावल्याची बातमी समोर आली. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर एक वर्ष परदेशात राहुन, तिथे उपचार घेऊन ऋषी कपूर मुंबईत परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये दोनवेळा इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन ते पुन्हा घरी गेले होते. परंतु आज सकाळी मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 1970 ते 2020 असा प्रदीर्घ काळ ऋषी कपूर आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकत राहिले आणि बॉक्स ऑफिसवरसुद्धा धुमाकूळ घालत राहिले.
इट्स कपूर अँड सन्स – 1952 साली चेंबूर येथे ऋषी कपूर यांचा जन्म झाला. भारतीय चित्रपट सृष्टीतील “द ग्रेट शोमॅन” म्हणून प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांचे सुपुत्र म्हणजेच ऋषी कपूर. आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते वडील राज कपूर, काका शम्मी कपूर व शशी कपूर, भाऊ रणधीर कपूर व राजीव कपूर अश्या अभिनय क्षेत्रातच काम करणाऱ्या कुटुंबाचा – अभिनयाचा आणि लोकांचे मनोरंजन करण्याचा वारसा ऋषी कपूर यांनी अविरतपणे चालवला. ऋषी कपूर यांचा सुपुत्र असलेला तरुणाईचा लाडका रणबीर कपूरसुद्धा ही परंपरा पुढे चालवतो आहे.
ओळखीचा प्रवास – ऋषी कपूर यांची मोठ्या पडद्यावर एंट्री खरं तर वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी झाली. वडील राज कपूर यांच्या “श्री 420” या चित्रपटातील “प्यार हुआ, इकरार हुआ” या सुप्रसिद्ध गाण्यात दिसणारा बालकलाकार म्हणजे ऋषी कपूर. यानंतर 1970 मध्ये “मेरा नाम जोकर” या राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातून ऋषी कपूर झळकले. खऱ्या अर्थाने ऋषी कपूर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली तो चित्रपट म्हणजे “बॉबी.” 1973 मध्ये रिलीज झालेला डिंपल कपाडिया या अभिनेत्री सोबत केलेला हा सिनेमा म्हणजे आजच्या पिढीलासुद्धा रोमँटिकपणा अनुभवायला लावणारा एव्हरग्रीन सिनेमा. या सिनेमाच्या अनुषंगाने एका मुलाखतीत बोलताना ऋषी कपूर यांनी एक आठवण सांगितली होती. ते म्हणाले होते की, “बॉबी सिनेमाबद्दल खरं तर अनेकांचा गैरसमज असा आहे की हा सिनेमा माझ्या वडिलांनी मला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी दिग्दर्शित केला. पण सत्य असं होतं की या सिनेमामध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांना नवयुवकाची प्रेमकथा रंगवायची होती आणि त्यावेळी राजेश खन्नाला भूमिका देण्याइतपत पैसे त्यांच्याकडे नसल्याने ही भूमिका मला मिळाली.” बॉबी हा सिनेमा भारतातील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे..!! यातील भूमिकेसाठी ऋषी कपूर यांना त्यांच्या आयुष्यातील पहिले Filmfare Best Actor Award मिळाले. या नंतर 1970 च्या दशकात ते अनेक हलक्या-फुलक्या विनोदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि यातले सगळेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले.
1975 मध्ये नीतू सिंग सोबतचा ‘रफू चक्कर’, 1977 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘अमर, अकबर, अंथनी’ आणि झीनत अमान यांच्यासोबत ‘खेल खेल मे’ (1975) व ‘हम किसींसे कम नहीं’ (1977) अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून ऋषी कपूर प्रेक्षकांचे लाडके “चॉकलेट हिरो” बनत गेले. नितु सिंग यांच्यासोबत 1980 मध्ये त्यांनी विवाह केला. आजतागायत ही जोडी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय करताना दिसून आली. या दोघांचा एकत्रित अभिनय केलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘जेहरीला इंसान’ जो 1974 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘कभी कभी’ आणि ‘दुसरा आदमी’ अशा चित्रपटांत त्यांनी काम केलं. 1973 ते 2000 दरम्यान लगातार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात ऋषी कपूर यशस्वी ठरले. “राजा” (1975), “लैला मजनू”(1976), “सरगम”(1979), “प्रेम रोग” (1982), “कुली”(1983), “सागर” (1985),”चांदनी” (1989), “बोल राधा बोल” (1992), “दामिनी”(1993), “कारोबार” (1999) असे असंख्य ब्लॉकबस्टर चित्रपट ऋषी कपूर यांच्या भूमिकेमुळे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. याच दरम्यान 2000 मध्ये त्यांनी “आ अब लौट चले” या चित्रपटातुन दिग्दर्शन क्षेत्रातसुद्धा पदार्पण केलं.
अनोळखी प्रवास – ऋषी कपूर यांच्या एकूण करिअरमधले अजून दोन महत्वाचे सिनेमे जे त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळात केले ज्यांचा उल्लेख फारसा केला जात नाही ते म्हणजे “कर्ज” (1980) आणि “एक चादर मैली सी”(1986). सुभाष घाई यांनी दिग्दर्शित केलेला कर्ज हा थ्रीलर प्रकारातील सिनेमा जो बॉक्स ऑफीसवर फारसा यशस्वी ठरू शकला नाही. परंतु नंतर मात्र यातील ऋषी कपूर यांच्या भूमिकेमुळे हा चित्रपट बराच चर्चेत राहिला. “एक चादर मैली सी” हा राजेंद्र सिंग बेदी यांच्या कादंबरीवर आधारित एक वेगळ्या धाटणीचा आणि दुर्लक्षित विषयावर लक्ष वेधून घेणारा चित्रपट म्हणून चर्चेत राहिला. 2000 नंतरच्या काही वर्षांमध्ये ऋषी कपूर हे प्रमुख भूमिकेतुन सहाय्यक अभिनेता या भूमिकेत बॉलिवूडमध्ये दिसू लागले. “हम तुम”, “फना”, “नमस्ते लंडन”, “लव्ह आज-कल”, “दिल्ली -6” अश्या चित्रपटांमधून त्यांनी हलक्या फुलक्या भूमिका साकारत प्रेक्षकांवर आपली मोहिनी टाकली. 2007 मध्ये “Don’t Stop Dreaming” या आदित्य राज कपूर दिग्दर्शित इंग्रजी चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. 2011 मधील “दो दुनी चार” या चित्रपटात, एका मध्यमवर्गीय धडपडणाऱ्या बापाच्या भूमिकेत ते दिसून आले. याच भूमिकेसाठी त्यांना Filmfare Critic Award For Best Actor देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 2012 मध्ये “अग्निपथ” या सिनेमामध्ये “रौफ लाला” ही ऋषी कपूर यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका अजरामर ठरली. याच वर्षी Student Of The Year या चित्रपटातसुद्धा ते सहाय्यक अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच “Housfull-2” या चित्रपटातुन ऋषी कपूर आणि रणधीर कपूर हे दोघे भाऊ एकत्र मोठ्या पडद्यावर झळकले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या “D-Day” या चित्रपटात दाऊद इब्राहिमच्या रोलमध्ये ऋषी कपूर दिसून आले. याच सिनेमामध्ये इरफान खान आणि ऋषी कपूर हे दोन लोकप्रिय अभिनेते एकत्र दिसून आले होते, जे लागोपाठच्या दिवशीच आपल्यातून निघून गेले. 2016 मध्ये “कपूर अँड सन्स” मधील भूमिकेसाठी सुद्धा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. दरम्यानच्या वर्षात ते “शुद्ध देसी रोमान्स”, “पटियाला हाऊस”, “औरंगजेब”, “बेशरम” , “बेवकुफिया”, “सनम रे”, “चष्मे बद्दूर” अशा अनेक चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसले. 2017 मध्ये परेश रावल आणि ऋषी कपूर हे दोन दिग्गज कलाकार “पटेल की पंजाबी शादी” या चित्रपटात एकत्र दिसले.
2018 मध्ये उर्दू लेखक सादत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारित नंदिता दास लिखित आणि दिग्दर्शित “Manto” या बायोग्राफी प्रकारातील सिनेमामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. 2018 मध्ये Netflix च्या माध्यमातून “राजमा-चावल” घेऊन ते प्रेक्षकांना भेटले. यापुढील काळात तब्बल २० वर्षांनंतर अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे दोन दिग्गज कलाकार “102-Not Out” या चित्रपटातुन एकत्र आले. यामध्ये 102 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्या 76 वर्षीय मुलाच्या भूमिकेत ऋषी कपूर दिसून आले. त्यामुळे हाही सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला. या नंतर “मुल्क” या चित्रपटात त्यांनी अतिशय वेगळी भूमिका साकारली, जी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आणि अभिमान म्हणून नावाजली जाते. भारतामध्ये राहणाऱ्या इमानदार मुस्लिमांची व्यथा सांगणारा, सर्वांच्याच अंगावर काटा उभा करणारा रोल यामध्ये ऋषी कपूर यांनी पार पाडला होता. या नंतर 2019 मध्ये “झूठा कहीं का” आणि ” द बॉडी” या दोन चित्रपटांमध्ये त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका पार पाडली. “द बॉडी” हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट ठरला. याशिवाय हितेश भाटिया दिग्दर्शित “शर्माजी नमकीन” या चित्रपटाचे काम जुही चावला यांच्यासोबत सुरू होते परंतु तो चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्यांचं निधन झालं.
2008 मध्ये ऋषी कपूर यांना Filmfare Lifetime Achievement Award मिळाला. याशिवाय 2009 मध्ये रशियन सरकारकडून सिनेमा क्षेत्रातील कारकिर्दीसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 2011 मध्ये Zee Cine Awards कडून Best Lifetime Jodi Award हा सन्मान त्यांना नितु सिंग यांच्यासोबत मिळाला. तसेच 2013 मध्ये The Times Of India Film Award हा सन्मान अग्निपथ सिनेमातील रौफ लाला या खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना प्राप्त झाला.
गाणी आणि ऋषी कपूर – ऋषी कपूर यांची गाणी ऐकण्याबरोबरच पडद्यावर पाहणं ही वेगळीच रिफ्रेशमेंट असते. त्यांची कित्येक गाणी आजच्या पिढीतील तरुणसुद्धा गुणगुणत असतात. ‘पायलिया ओ हो हो हो’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं’, सोचेंगे तुम्हे प्यार, करके नहीं’, ‘सागर जैसी आँखोवाली’, ‘होगा तुमसे प्यारा कोन’, ‘चांदणी’, ‘मैं शायर तो नहीं’, ‘एक मै और एक तु’, ‘ओ हंसिनी’, ‘जीवन के हर मोड पर मिल जाते है हमसफर’, ‘मेरी उमर के नौजवानो’, ‘क्या मौसम है ये दिवाने दिल’, ‘नजरों से कह दो प्यार में मिलने का मौसम आ गया ‘, ‘जब से तुमको देखा है सनम’,’ चुम लो ओठ तेरे दिलकी यही ख्वाइश है ‘,’ तेरे मेरे ओंठो पे मिठे मिठे गीत मितवा’, ‘तु है वहीं…दिलने जिसे अपना कहा’ या आणि अशा एक से बढकर एक रोमँटिक गाण्यांची यादी आठवली की गोबऱ्या गालाचे ऋषी कपूर, त्यांचे रंगीबेरंगी स्वेटर आणि त्यांचा तो रोमँटिक अंदाज डोळ्यांसमोर कायम उभे राहतात.
खुल्लम-खुल्ला – आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्याबद्दल सगळं काही जाणून घ्यावं असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असतं. एखाद्या चाहत्याच्या आपल्या आवडत्या कलाकाराने लिहिलेल्या आत्मचरित्राकडून ज्या अपेक्षा असतात त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरणारं ऋषी कपूर यांचं आत्मचरित्र म्हणजे खुल्लम-खुल्ला…!! 2017 मध्ये ऋषी कपूर यांचं खुल्लम-खुल्ला हे आत्मचरित्र त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला आलं. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक माणसाबद्दल, घटनेबद्दल आणि अनुभवाबद्दल प्रचंड प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे लिहिल्याचं जाणवतं. त्यांच्या स्वभावातला सच्चेपणा आणि स्पष्टवक्तेपणा त्यांच्या लिखाणातून वाचकांना भिडणारा वाटतो. या पुस्तकातुन त्यांनी कपूर घराण्यातील वातावरण आणि त्यात त्यांची झालेली जडणघडण, त्यांच्यावर झालेले संस्कार, कुटुंबात मिळत गेलेले अभिनयाचे धडे, “मेरा नाम जोकर” चित्रपटात काम करण्यासाठी म्हणून शाळेला दांडी मारणं अशा आपल्या लहानपणापासूनच्या कित्येक आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच आपल्या सुपरहिट गाण्यांनी त्यांनी गाजवलेला काळ, रोमँटिक फिल्म्स वगळता इतर काही हटके फिल्ममध्ये काम करताना आलेले अनुभव आणि किस्से, इतकी वर्षे चित्रपटांमध्ये ज्या वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत भूमिका पार पाडल्या त्यांच्यासोबत असणारे नातेसंबंध, त्याबद्दल होणाऱ्या चर्चा, गॉसिप्स अश्या सगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे. आपल्या कामाप्रति असणारं प्रेम, कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी यांच्यासोबतच्या आठवणी, स्वतःच्या आवडी-निवडी त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. बॉलिवूडमध्ये अलीकडे जरी बरेच नवे कलाकार आपल्याला सामोरे जावे लागलेल्या डिप्रेशनबद्दल खुलेपणाने बोलत असले तरी त्या काळातील ज्येष्ठ कलाकाराने आपल्याला आलेल्या डिप्रेशनबद्दल इतक्या वर्षांनी खुलेपणाने सांगणं असं उदाहरण दुर्मिळ वाटतं. या पुस्तकात ऋषी कपूर यांनी जेव्हा प्रमुख भूमिका मिळत न्हवत्या त्या काळामध्ये आपल्याला आलेल्या डिप्रेशनबद्दलसुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे. अशा अनेक कारणांमुळे आजवर भारतीय कलाकारांच्या आत्मचरित्रांपैकी सर्वोत्तम आणि आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी “दिल से” लिहिलं गेलेलं आत्मचरित्र म्हणून ऋषी कपूर यांचं “खुल्लम-खुल्ला” हे पुस्तक नावाजलं जातं..!!!
अलविदा ऋषीदा – निवांत, सदा हसतमुख, फ्रेश, विनोदी, खेळकर अशा हलक्या-फुलक्या भूमिकांमधून ते सातत्याने प्रेक्षकांना भेटत राहिले. प्रेक्षकांचं मनोरंजन करणे, त्यांना हसवत राहणे आणि चित्रपट पाहून सिनेमगृहातून बाहेर पडत असताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणे..!! हे काम जवळपास ५० वर्षं ऋषीदांनी केलं. आणि कदाचित म्हणूनच या ५० वर्षांच्या काळात ऋषी कपूर यांनी मोठ्या पडद्याच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांच्या मनात असं स्वतःचं स्थान निर्माण केलं, ज्या स्थानी इतर कुणीही येऊ शकणार नाही. ऋषी कपूर यांचं अस्तित्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी या क्षणापर्यंत हवंहवंस वाटतंय. त्यांच्या असंख्य चाहत्यांशी असणारं इतकं घट्ट आणि अतूट नातं ऋषी कपूर शेवटच्या क्षणापर्यंत जपत राहिले. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या फॅन्सच्या मनातील त्यांच्या स्थानाची पोकळी भरुन निघणे आता अशक्यच..
रुपेरी पडद्यावरील हा विनोदी आणि कमालीचा रोमँटिक माणूस आणखी काही काळ आपल्या सोबत हवा होता असं मनोमन प्रत्येकालाच वाटतंय. माझ्या पिढीचं म्हणाल तर एकत्र कुटुंबातील काका आणि आजोबांसारखी माणसं अचानक शांत होतात, तेव्हा घर जसं खायला उठतं तसंच वातावरण सध्या कोरोनाकाळात इरफान खान आणि ऋषी कपूर या सच्च्या कलाकारांच्या जाण्यामुळं झालं आहे. ऋषी कपूर यांच्या रूपाने लाभलेल्या बिनधास्त आणि जॉली व्यक्तिमत्त्वाला गमावल्याचं दुःख दीर्घकाळ सोबत राहील..लव्ह यू प्रेमरोगी ऋषीदा, मिस यू अ लॉट..!!
लेखिका या मानसशास्त्र विषयातील पदवीधर असून त्यांना वाचन, लिखाण आणि प्रवासाची विशेष आवड आहे. संविधानिक मूल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, वयात येताना आणि जोडीदाराची विवेकी निवड या विषयांवर त्या मुक्त संवादही घेतात. त्यांचा संपर्क क्रमांक – 8408877063