50 फूट उंचीवरून कोसळला आकाशपाळणा; 16 गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील फेज-आठ येथील दसरा मैदानावर काल संध्याकाळी उंच आकाश पालन खाली पडल्याने दोन मुलांसह 16 जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी मोहालीच्या फेज-6 येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेज-8 च्या दसरा मैदानावर लंडन ब्रिज नावाने जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारची सुट्टी असल्याने याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ड्रॉप टॉवर स्विंगजवळ मोठी गर्दी होती. सुमारे 30 जण पाळण्यावर स्वार होऊन आनंद लुटत होते. झोका गोल फिरत फिरत वरच्या दिशेने गेला होता, मात्र वर गेल्यानंतर त्यात काहीतरी बिगाड झाला आणि सुमारे 50 फूट उंचीवरून अत्यंत वेगाने खाली आपटला.

अपघात एवढा भीषण होता की अनेकांचे सीटबेल्ट तुटून बाहेर पडले. हा आकाशपाळणा खाली पडताच ऑपरेटर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. यादरम्यान जत्रेच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. घटनास्थळी पोहोचलेले डीएसपी सिटी-2 हरसिमरन सिंग बल यांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेची चौकशी करून त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.