हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार यांचे नेतृत्व केवळ पद आणि निवडणुका पुरते मर्यादित नसून ते व्यापक व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय हा धक्कादायक आहे. मात्र, पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असणार आहोत. केवळ निवडणूक न लढवण्याचा किंवा पक्षीय पदावर न राहण्याचा त्यांचा मानस दिसतोय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.
खा. श्रीनिवास पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार साहेब व मी 1958 पासून युवक काँग्रेसमधून सुरूवात केली. त्यांनी सलग 65 वर्षे समाजसेवा केली. आज त्यांनी अध्यक्षपदाच्या निवृत्तीबाबत घोषणा केली आहे. त्यांनी आता पुढील पिढीसाठी आखलेले धोरण आणि जे बांधतील ते तोरण हिच आमच्या सारखा कार्यकर्त्यांची भूमिका राहिल. पुढच्या पिढीला काहीतरी भरीव देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, जबाबदारी असलेल्या संस्थांना अधिक प्रभावी करण्यासाठी ते जास्त वेळ देणार आहेत, असे वाटते.
कुठतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा निर्णय पवार साहेबांचा दिसतोय. त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे मार्गदर्शन घेत राहू. महाभारतात श्री कृष्णाने मी शस्त्र हातात घेणार नाही असा पण केला होता. मात्र जागेवर बसून मार्गदर्शन केले तरी सुध्दा युध्दात चमत्कार घडवून आणला होता. तशाप्रकारे नुसते जागेवर बसून व मार्गदर्शन करूनही कलाटणी घडवण्याची ताकद पवार साहेबांमध्ये आहे, असे पाटील यांनी यावेळी म्हटले.