हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 6 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश देत एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यानंतर अशाप्रकारे कोणतेही आंदोलन न करण्याचा इशारा दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन आणि ग्रॅज्युएटीवरही कुठलाही परिणाम न होऊ देण्याचे निर्देशही महामंडळाला हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे, राज्यात 22 एप्रिलपासून एसटी पुन्हा जोमाने धावण्याची शक्यता आहे.
यापूर्वी राज्य सरकारने देखील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले होते. मात्र कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर आज हायकोर्टानेच कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टीमेटम देत 22 एप्रिल पर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
याआधी बुधवारी झालेल्या सुनावणीत सध्याच्या कसोटीच्या काळात आपले उपजीविकेचे साधन गमावू नका आणि जनतेला त्रास होऊ देऊ नका, असे आवाहन करत कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना केली होती. संपकऱ्यांना एक संधी देऊन त्यांच्यावरील कारवाईच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबरोबरच त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या, अशी सूचनाही कोर्टाने महामंडळाला केली होती.