हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्ष सूडबुद्धीने ही कारवाई करत आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यात आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीउडी घेतली असून भाजपवर निशाणा साधला आहे. ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करत आहे, भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का नाही?, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. राज ठाकरेंवर याआधी चौकशी लावली. आता प्रताप सरनाईकांवर चौकशी लावली. शरद पवारांचीही चौकशी लावली, मग दानवे काय शुद्ध घी वाले आहेत काय?, असं टीकास्त्र बच्चू कडूंनी सोडलं आहे
केंद्राकडून याचं राजकारण होत आहे. जो बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करण्याचा प्रकार निश्चितच होत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो, असंसुद्धा बच्चू कडू म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’