हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा चांगलाच फटका मराठवाड्याला बसला असून येथील सुमारे 22 लाखहुन अधिक हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. “अतिवृष्टीतील नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ आढावा बैठक घेत जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी मदत कार्य पोहचवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री ठाकरे लवकरच येथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “अतिवृष्टीमुळे सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. औरंगाबादमध्ये महिन्यात 71 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. 22 लाख हेक्टर जमीन आणि शेतक-यांचे नुकसान झाले. प्रचंड असे नुकसान आहे.”
राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले.या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच या ठिकाणचा दौरा करणार आहेत. मराठवाडासह विविध भागात झालेल्या नुकसानीची तेथील मंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीं कडून माहिती घेऊन ती मुख्यमंत्री ठाकरेंपर्यंत पोहचवली जात असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.