औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेल्या गुलमंडी ते पैठणगेट रस्त्यावरील फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी शहीद भगतसिंह पत्र विक्रेता युनियनच्या वतीने आज बंद व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पोलिस प्रशासनाने मोर्चास परवानगी न दिल्याने युनियनने गाड्या बंद ठेवत आंदोलन केले. तसेच यावेळी प्रभारी आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शहरातील पैठणगेट- गुलमंडी रस्त्यावर चार चाकी हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सविरुद्ध व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते. प्रशासनाने त्यांना आश्वासन दिल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले होते. पण त्या विरुद्ध फेरीवाल्यांनी आंदोलनाचा इशारा देऊन मोर्चाही काढण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिस प्रशासनाने मोर्चास परवानगी नाकारल्याने फेरीवाल्यांच्या वतीने मोर्चा रद्द केला. त्यामुळे आज सकाळपासून हातगाडीवाले यांनी बंद पुकारला होता.
मनपा उपायुक्त सौरभ जोशी यांनी पैठणगेट येथे भेट देऊन त्यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी युनियनच्या वतीने ॲड. अभय टाकसाळ, भालचंद्र चौधरी, किरणराव पंडित, विकास गायकवाड, इसाक शेख, विजय रोजेकर, शहाबान यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले.