स्मशानभूमीतील अग्निकुंड चोरीस : रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

चोरटे काय आणि कुठं चोरी करतील याचा नेम नाही. चोरट्यांनी आता स्मशानभूमीत अग्निकुंड चोरी केल्याने संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथील स्मशानभूमीतील असलेले 3 अग्निकुंडासह बिडाच्या 33 पट्ट्याही अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे समोर आले आहे.

घटनास्थळावरून गावकऱ्यांनी दिलेली माहिती अशी, सातारा- रहिमतपूर मार्गावर धामणेर हे गाव आहे. या गावच्या नदीकाठी स्मशानभूमी असून लोखंडी अग्निकुंड अंत्यसंस्कारासाठी बसविण्यात आले आहेत. अग्निकुंडांना बिडाच्या पट्याही बसविण्यात आलेल्या आहेत. रात्रीत चोरट्यांनी स्मशानभूमीतील अग्निकुंडावर डाव साधल्याने ग्रामस्थांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

धामणेर येथील 3 अग्निकुंडासह बिडाच्या 33 पट्ट्याही चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. या चोरीत चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज स्मशानभूमीतून चोरून नेला आहे. धामणेरचे पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच याबाबत रहिमपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. आता स्मशानातील अग्निकुंड आणि बिडाच्या पट्ट्या शोधण्याची वेळ रहिमतपूर पोलिसांवर आली असून याचा तपास रहिमतपूर पोलीस करत आहेत.