जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जळगाव शहरातील गवळीवाडा या ठिकाणी दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. मात्र या दोन गटांमध्ये कोणत्या कारणामुळे दगडफेक झाली हे मात्र समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) March 14, 2022
हाती आलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास गवळीवाड्यात दोन गटात कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण इतकं मोठं होतं की वाद घालणारे एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करु लागले. त्यानंतर त्यांच्यातील हे भांडण हाणामारीपर्यंत पोहोचले. यानंतर पुढे या भांडणाचे दगडफेकीत रूपांतर झाले. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या कामाच्या ठिकाणच्या दगडांचा वापर करण्यात आला. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीदरम्यान एक जणाची कारसुद्धा फोडण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
हा सगळा प्रकार सुरु असताना परिसरातील लोकं भयभीत होऊन घरात लपली. यानंतर दोन गटांमध्ये सुरु असलेल्या या भयानक जीवघेण्या भांडणाची माहिती कुणीतरी पोलिसांनी दिली. यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह शनिपेठ पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.